प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात घरच्या मैदानावर पराभवाचं दुष्टचक्र आता यूपी योद्धाज संघाच्या पाठीमागे लागलेलं आहे. आज घरच्या मैदानावर सलग तिसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. जयपूर पिंक पँथर्सच्या संघाने यूपी योद्धाजवर २४-२२ अशी मात केली. अखेरच्या मिनीटापर्यंत हा सामना रंगतदार झाला होता, दोन्ही बाजूच्या खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करत आपल्या संघाची बाजू सामन्यात वरचढ ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखरेच्या क्षणी जयपूरच्या जसवीर सिंहने संयमी खेळ करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

उत्तर प्रदेशचा संघ या पर्वात नवीन असला, तरीही त्यांच्याकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. मात्र यूपीच्या संघाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ आज मैदानावर करता आलेला नाही. कर्णधार नितीन तोमर आणि रिशांक देवाडीगाने चढाईमध्ये ९ गुणांची कमाई केली. मात्र त्यांना इतर खेळाडूंची तितकीशी साथ मिळाली नाही. महेश गौड आणि राजेश नरवालला आजच्या सामन्यात चमक दाखवता आली नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशचा संघ काहीसा अडचणीत सापडलेला पहायला मिळाला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – पुणेरी पलटणचा संघर्षमय विजय, पाटणाची कडवी झुंज

मात्र जयपूर पिंक पँथर्सने कर्णधार मनजीत छिल्लरच्या अनुपस्थितीत चांगला खेळ केला. तुषार पाटील, जसवीर सिंह यांनी आज संयमी खेळ करत आपल्या संघाची बाजू अखेरच्या क्षणापर्यंत वर ठेवली. दोघांनी मिळून आजच्या सामन्यात ९ गुणांची कमाई केली. त्यांना संघातल्या बचावपटूंनीही तितकीच मोलाची साथ दिल्यामुळे जयपूरला आज सामना जिंकण सोपं झालं.