प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात तेलगू टायटन्सपाठोपाठ यूपी योद्धाज संघाचा घरच्या मैदानावर पराभूत होण्याचा सिलसिला सुरुच आहे. आज बंगाल वॉरियर्सविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या लढाईत उत्तर प्रदेशच्या संघाला ३२-३१ अशा एका गुणाच्या फरकाने पराभव स्विकारावा लागला. या लढतीत पंचानी दिलेल्या काही वादग्रस्त निर्णयांचा फायदा उत्तर प्रदेशच्या संघाला होणार होता. मात्र सामन्याच्या सुरुवातीपासून केलेली मेहनत आणि दिपक नरवालने अखेरच्या क्षणापर्यंत दाखवलेली समयसुचकता कामाला आल्यामुळे हा सामना एका गुणाच्या फरकाने बंगालच्या झोळीत पडला.

बंगालकडून आज चढाईत दिपक नरवालने कमाल केली. १० गुणांची कमाई करत दिपकने मोक्याच्या क्षणी आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्यात मदत केली. उत्तर प्रदेशच्या बचावफळीतील महत्वाच्या खेळाडूंच्या हालचालीचा अभ्यास दिपकच्या खेळात दिसत होता. महत्वाच्या क्षणी खेळाडूंना चकवण, बोनस पॉईंट घेण यासारख्या गुणांच्या आधारावर दिपक बंगालसाठी आज सामन्याचा हिरो ठरला. त्याला मणिंदर सिंह, जँग कून लीने सामन्यात ६ गुण मिळवत चांगली मदत केली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – गुजरातच्या इराणी तडक्यापुढे पुणेरी पलटण बेजार

सामन्यात एका क्षणी उत्तर प्रदेशचा संघ बंगालवर आघाडी घेण्याच्या तयारीत होता, मात्र त्यावेळी संयमी खेळ करत बंगालच्या बचावपटूंनी पुन्हा सामन्याचं पारडं बंगालच्या बाजुने झुकवलं. बंगालकडून बचावफळीत रणसिंह, कर्णधार सुरजित सिंह यांनी ३-३ गुणांची कमाई केली.

अवश्य वाचा – यू मुम्बाच्या काशिलींग आणि नितीनची लहानग्या कबड्डीपटूंसोबत मस्ती

उत्तरप्रदेशच्या चढाईपटूंनी आजच्या सामन्यात परतण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र बचावपटूंनी त्यांना योग्य वेळी साथ न दिल्यामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. कर्णधार नितीन तोमर, रिशांक देवाडीगा, महेश गौड यासारख्या प्रत्येक खेळाडूने महत्वाच्या गुणांची कमाई करत आपल्या संघाचं आव्हान कायम ठेवलं होतं. मात्र बचावपटूंना आजच्या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे शेवटच्या सेकंदारपर्यंत रंगलेल्या सामन्यात उत्तर प्रदेशचा संघ एका गुणाच्या फरकाने पराभूत झाला.