प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात तिसऱ्या आणि चौथ्या पर्वाच्या विजेत्या पाटणा पायरेट्स संघाला पराभवाचा धक्का सहन कराला लागला आहे. पुणेरी पलटणने गतविजेत्या पाटणा पायरेट्सवर ४७-४२ अशी मात केली. अखेरच्या मिनीटांपर्यंत हा सामना नेमकं कोण जिंकणार हे नक्की होत नव्हतं, मात्र मोक्याच्या क्षणी पुण्याच्या बचावफळीने भक्कम बचाव करत संघाला विजय मिळवून दिला. पाटणा पायरेट्सचा या पर्वातला हा पहिलाच पराभव ठरला.

पुणेरी पलटणच्या संघाने आज अष्टपैलू खेळ केला. पहिल्या सत्रात पाटण्याच्या संघाला दोन वेळा ऑलआऊट करण्यात पुण्याला यश आलं. चढाईपटूंनी केलेल्या मेहनतीला बचावपटूंनीही तितकीच चांगली साथ दिल्यामुळे पुण्याला या सामन्यात विजय मिळवता आला. पुण्याकडून चढाईमध्ये राजेश मोंडलने सर्वाधीक १० गुणांची कमाई केली. त्याला कर्णधार दिपक हुडाने ९ गुण मिळवत तितक्याच तोलामोलाची साथ दिली. दुसऱ्या सत्रात आघाडी भरुन काढत पाटण्याच्या संघाने पिछाडी भरुन काढत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बदली खेळाडू मोनूने चढाईत ५ गुण मिळवत पाटणा पायरेट्सला बॅकफूटवर ढकललं.

पुण्याच्या बचावफळीने आज अभ्यास करत पाटण्याच्या चढाईपटूंना शांत बसवलं. बांगलादेशचा बचावपटू झियाऊर रेहमानला आज संघात जागा मिळाली, त्याचा पुरेपूर फायदा उचलत झियाऊरने बचावात ६ गुण मिळवले. विशेषकरुन पाटणा पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालला त्याने टार्गेट केलं. बहुतांश वेळा डबल थायहोल्ड करत प्रदीपची कोर्टमधली हालचाल झियाऊरने जखडून टाकली. त्याला संदीप नरवाल आणि गिरीश एर्नेकने सामन्यात ७ गुण मिळवत चांगली साथ दिली.

पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही पाटणा पायरेट्सने पुण्याला चांगलंच झुंजवलं. पहिल्या सत्रातली पिछाडी भरुन काढत पाटणाने दुसऱ्या सत्रात पुण्याला चांगली टक्कर दिली. पाटण्याकडून कर्णधार प्रदीप नरवालने आक्रमक खेळ करत सामन्यात तब्बल १९ गुण मिळवले. मात्र यातील बहुतांश गुण हे दुसऱ्या सत्रात आले. त्यात पहिल्या सत्रात पाटण्याचा संघ पिछाडीवर असताना प्रदीपला इतर चढाईपटूंनी फारशी साथ दिली नाही. त्यामुळे पाटण्याचा संघ पहिल्या सत्रात दबावाखाली आलेला दिसला. पाटण्याच्या बचावफळीलाही आज फार विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे सामन्यात चढाईपटूंना विजयासाठी जास्त मेहनत घ्यावी लागली.

या पर्वात पाटणा पायरेट्सला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही, अखेरच्या सत्रात कडवी टक्कर देत पाटण्याने आपल्या पराभवाचं अंतर हे ७ गुणांपेक्षा कमी ठेवलं. या सामन्यानंतर पाटणा पायरेट्सच्या खात्यात १ गुण जमा होणार आहे. त्यामुळे आगामी सामन्यात हे दोन्ही संघ कशी कामगिरी करतात हे पहावं लागणार आहे.