प्रो-कबड्डीच्या पहिल्या तीन पर्वांमध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या यू मुम्बाचा पाचव्या पर्वातला प्रवास आज अखेर संपुष्टात आला आहे. साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या यू मुम्बाला आज पुणेरी पलटणने ४३-२४ अशा मोठ्या फरकाने पराभूत केलं. तामिळ थलायवाजप्रमाणे मुम्बाचा संघही पाचव्या पर्वाची अखेर विजयाने करतो का याकडे सर्वांचं लक्ष होतं, मात्र आपल्या अखेरच्या सामन्यातही यू मुम्बाच्या खेळाडूंनी निराशाजनक खेळ केला.

घरच्या मैदानावर पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या पुण्याच्या संघाने मुम्बाविरुद्धच्या सामन्यात कोणतीही कसर सोडली नाही. चढाई आणि बचाव या दोन्ही क्षेत्रात पुणेरी पलटणने अष्टपैलू खेळ केला. पुण्याकडून आजच्या सामन्याचा हिरो ठरला तो कर्णधार दिपक हुडा. दिपकने आजच्या सामन्यात १६ गुणांची कमाई केली. त्याला राजेश मोंडलने ६ गुण मिळवत चांगली साथ दिली. मोनू आणि सुरेश कुमार या दोन खेळाडूंनीही आपल्यापरीने संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. यू मुम्बाच्या बचावफळीला खिंडार पाडण्याचं मोठं काम दिपक हुडाने पहिल्या सत्रात केलं, या धक्क्यातून यू मुम्बा सावरुच शकली नाही.

चढाईप्रमाणे पुण्याच्या बचावपटूंनीही घरच्या मैदानावर खेळताना आपला बोलबाला कायम ठेवला. उजवा कोपरारक्षक गिरीश एर्नेकने सामन्यात बचावात ८ गुण मिळवले. यू मुम्बाचा कर्णधार अनुप कुमार, श्रीकांत जाधव यासारख्या खेळाडूंना सतत संघाबाहेर ठेवण्यात गिरीश एर्नेक यशस्वी ठरला. गिरीशच्या पकडीचं उत्तर यू मुम्बाच्या चढाईपटूंकडे दिसलं नाही. गिरीशला अनुभवी बचावपटू धर्मराज चेरलाथनने २ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली.

आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या यू मुम्बाने काशिलींग अडकेला संघात स्थान दिलं नाही. त्यामुळे चढाईची जबाबदारी ही श्रीकांत जाधव आणि अनुप कुमार यांनी सांभाळली. श्रीकांतने सामन्यात चढाईत ६, कर्णधार अनुप कुमारने ४ तर दर्शन कादियानने २ गुणांची कमाई केली. मात्र त्यांच्या कामगिरीत म्हणावं तसं सातत्य दिसून आलं नाही. बदली खेळाडू नितीन मदनेने अखेरच्या सत्रात चढाईत ३ गुण मिळवले, मात्र तोपर्यंत सामना हातातून निघून गेला होता. बचावफळीत दिपक यादव आणि जोगिंदर नरवालचा अपवाद वगळता सर्व खेळाडूंनी पुन्हा निराशा केली.