तेलगू टायटन्सच्या संघासाठी प्रो-कबड्डीचा यंदाचा हंगाम हा अतिशय आव्हानात्मक मानला जात आहे. आपल्या घरच्या मैदानात खेळताना तेलगू टायटन्सला सलग ५ वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर नागपूरमध्ये झालेल्या सामन्यांमध्येही तेलगू टायटन्सला फार चमकदार कामगिरी करता आलेली नाही. तेलगू टायटन्सचा संघ हा कर्णधार राहुल चौधरीच्या कामगिरीवर विसंबून असल्यासारखा खेळ करतो आहे. तेलगू टायटन्सकडून खेळणाऱ्या मराठमोळ्या निलेश साळुंखेने आतापर्यंत राहुल चौधरीला चांगली साथ दिली आहे. मात्र संघातल्या इतर खेळाडूंची योग्य साथ न मिळाल्यामुळे तेलगूला सतत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

नागपूर दौऱ्यात बंगळुरु बुल्सविरद्ध तेलगू टायटन्सला २१-२१ अशा बरोबरीवर समाधान मानावं लागलं. मात्र या दौऱ्यात पंचांच्या कामगिरीवर तेलगू टायटन्सच्या निलेश साळुंखेने आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘स्पोर्ट्सकिडा’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत निलेश साळुंखेने आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

“संपूर्ण सामन्यात पंचांनी मला एकदाही बोनस पॉईंट दिला नाही. हा प्रकार एकदा नाही, तर २-३ वेळा घडला. माझा पाय हा बोनस रेषेच्या जवळपास ५ इंच पुढे होता. मात्र प्रत्येक वेळा पंचांनी मला बोनस पॉईंट नाकारला. प्रत्येक वेळा बोनस पॉईंट मिळवल्यानंतर मी पंचांकडे पहायचो आणि ते मला पॉईंट नाकारायचे. माझं नेमकं चुकतंय तरी कुठे हे देखील मला कळत नव्हतं”, अशा शब्दांमध्ये निलेश साळुंखेने आपली नाराजी बोलून दाखवली.

या पर्वात तेलगू टायटन्सला पंचांच्या खराब कामिरीचा सातत्याने फटका बसत असल्याचंही निलेश साळुंखेने नमूद केलं. राहुल चौधरीलाही अनेकवेळा पंचांनी बोनस पॉईंट नाकारले होते. पाटणा पायरेट्सविरुद्ध या पर्वात आम्ही दोन सामने खेळले, या दोन्ही सामन्यांमध्ये मला आणि राहुलला पंचांच्या खराब कामगिरीचा फटका बसला आहे. आम्ही नेमकं कोणाचं काय बिघडवलं आहे, हेच मला कळत नसल्याचंही निलेश साळुंखेने बोलून दाखवलं.

या पर्वातल्या तेलगू टायटन्सच्या खराब कामगिरीबद्दल निलेश साळुंखे चिंतेत आहे. स्पर्धा म्हणली की त्यात चढ-उतार हे आलेच, मात्र आम्ही या स्पर्धेतला आमच्या लौकिकाला साजेसा खेळ करत नसल्याचंही निलेश साळुंखे म्हणाला. मात्र अजुनही आमच्याकडे स्पर्धेत पुनरागमन करण्याची संधी शिल्लक असल्याचं निलेश साळुंखेने नमूद केलंय.