प्रो कुस्ती लीगची घोषणा झाल्यानंतर आम्हाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दोन वर्षांमध्ये आम्ही सहा संघ लीगमध्ये खेळवणार आहोत. सध्याच्या घडीला आमच्याकडे महाराष्ट्रातील तीन कंपन्यांनी विचारणाही केली आहे. कदाचित महाराष्ट्रातले तीन संघही या लीगमध्ये खेळू शकतील, असे मत प्रो कुस्ती लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कालरा यांनी सांगितले.
या वेळीच कुस्ती लीग सुरू करण्याचे नेमके कारण काय, हे विचारल्यावर कालरा म्हणाले की, ‘‘भारतीय कुस्ती महासंघ गेल्या दोन वर्षांपासून लीग करण्यासाठी प्रयत्नशील होती, पण काही कारणास्तव हे सारे जुळून येत नव्हते. कधी खेळाडू तर कधी स्पर्धेची वेळ जुळून येत नव्हती. आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे वेळापत्रक दोन वर्षांपूर्वी ठरलेले असते. त्यामुळे आम्हाला ही वेळ मिळाली आणि त्याचबरोबर खेळाडूंकडूनही आम्हाला परवानगी मिळाली. जर आपल्याकडे एवढे ऑलिम्पिक खेळाडू आहेत, तर लीग व्हायलाच हवी आणि त्यासाठीच आम्ही हे शिवधनुष्य उचलले आहे.’’
यापुढे तुमची रणनीती काय असेल, असे विचारल्यावर कालरा म्हणाले की, ‘‘कोणते खेळाडू लीगमध्ये खेळणार हे आम्ही ठरवू, त्याचबरोबर संघटनेकडून आम्ही मान्यता घेणार आहोत. हे झाल्यावर प्रसारण कोण करणार, हे ठरवले जाईल. त्यानंतर संघांची घोषणा केली जाईल. कोणाकडे लीगमधील संघांची मालकी असेल याची घोषणा १५ सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतरच या लीगचे सामने कुठे होतील, हे स्पष्ट होऊ शकेल. त्यानंतर ज्या फँ्रचायझी असतील तिथे सामने खेळवले जातील.’’
लीगचा खेळाला कसा फायदा होतो, असे विचारल्यावर कालरा म्हणाले की, ‘‘क्रिकेट, बॅडमिंटन लीग आल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. रिओ ऑलिम्पिक हे माझे ध्येय आहे. या ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदके आपण पटकावू शकू, हा मला विश्वास आहे.’’
लीगच्या उद्देशाबाबत ते म्हणाले, ‘‘मी स्वत: राष्ट्रीय स्तरावरचा व्हॉलीबॉलपटू होतो. त्यामुळे माझ्यासाठी खेळाडू महत्त्वाचे आहेत, मग खेळ कोणताही असो. खेळाडू आहेत तर सामने आहेत, सामने झाले तर चाहते येतील आणि चाहते येतील तर लीग होईल. खेळाडू आणि खेळ यांची प्रगती व्हावी, हे माझे ध्येय आहे. त्यामुळे नावाजलेले खेळाडू या लीगमध्ये असतीलच, पण त्याचबरोबर युवा गुणवत्तेला आम्ही अधिक संधी देणार आहोत, कारण ते उद्याचे भविष्य आहेत.’’
कोल्हापूरपासून अभियानाला प्रारंभ
‘‘जसं लॉर्ड्स क्रिकेटची पंढरी मानले जाते, तसे कुस्तीसाठी हे स्थान कोल्हापूरचे आहे. जेव्हा कोल्हापूरला सामने होतात, तेव्हा केवढी गर्दी होते. साधारण अडीच लाख लोक सामने पाहायला येतात. हा खेळ आपल्याच महाराष्ट्रातल्या मातीतला आहे, ज्याला आम्ही नवे रूप देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आमचे महाराष्ट्रावर प्रधान्याने लक्ष असेल. त्यामुळे आम्ही प्रथम कोल्हापूरला जाऊन तेथील कुस्तीप्रेमी नागरिकांना प्रो कुस्ती लीगला पाठिंबा देण्यासाठी आवाहन करू,’’ असे कालरा यांनी सांगितले.