भारताचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने रणजी सामन्यादरम्यान एका प्रेक्षकाच्या श्रीमुखात दिल्याने मोठी खळबळ उडाली. पठाणच्या या कृतीमुळे त्याला दंड आकारला जाण्याची किंवा त्याच्यावर बंदी घातली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वडोदरातील रिलायन्स क्रिकेट मैदानात बडोदा आणि जम्मू काश्मीर यांच्यात रणजीचा सामना सुरू असताना हा प्रकार घडला. प्रेक्षकांमधील या तरूणाने वारंवार शाब्दिक अपमान केल्यामुळे युसूफ पठाणने त्याच्या कानशीलात लगावून दिल्याचे समजत आहे.
दरम्यान, या सगळ्या घटनेचा अहवाल सामनाधिकारी प्रसांता महोपात्रा यांना सुपूर्द करण्यात आला असून याबाबतीतील कारवाईचा निर्णय ते घेतील. सूत्रांच्या माहितीनुसार, पठाणची ही कृती क्रिकेटच्या नियमांनुसार दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाचा गुन्हा असल्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
प्रेक्षकांमधील संबंधित तरूण सामना सुरू असताना पठाण आणि बडोद्याच्या संघातील अंबाती रायडुसह अन्य खेळांडुना उद्देशून वारंवार टिप्पणी करत होता. युसूफ पठाण आणि अंबाती रायडू खेळपट्टीवर फलंदाजी करत असतानाही असाच प्रकार घडला. त्यात युसूफ स्वत: बाद झाल्यामुळे त्याच्या निराशेत आणखीनच भर पडली. बाद झाल्यानंतर युसूफने त्या तरूणाला ड्रेसिंग रूममध्ये बोलावून घेतले आणि दोनदा त्याच्या कानाखाली मारल्याचे बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या सचिव स्नेहल पारेख यांनी सांगितले. हा प्रकार समजल्यानंतर युसूफचा भाऊ इरफान पठाण लगेच त्या ठिकाणी गेला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर संबंधित तरूणाच्या नातेवाईकांनीही युसूफची माफी मागून हे भांडण मिटवले.