पुणे शहर पोलीस संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करीत डॉ. अविनाश भिडे स्मृती अखिल भारतीय निमंत्रित हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी मुंबई रिपब्लिकन संघाचे आव्हान ३-१ असे परतविले.
रक्षक स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत पोलीस संघाने मध्यंतराला १-० अशी आघाडी घेतली होती. त्यावेळी त्यांचा हा गोल अमोल भोसले याने सातव्या मिनिटाला विनोद निंबोरे याच्या पासवर केला. उत्तरार्धात पुन्हा याच जोडीने ४६ व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. निंबोरेच्या पासवर अमोलने सुरेख फटका मारून चेंडू गोलमध्ये तटविला व संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाच मिनिटांनी मुंबईच्या जयेश जाधव याने एल्डॉम डीसूझाच्या पासवर गोल करीत ही आघाडी कमी केली. ६३ व्या मिनिटाला पोलीस संघास पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत निंबोरे याने कुणाल जगदाळे याच्या पासवर संघाचा तिसरा गोल केले. पोलीस संघाने विजेतेपदासह २५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले तर उपविजेत्या मुंबई संघास १५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडूचे मानकरी ठरलेल्या अमोल भोसले (आक्रमक खेळाडू), अमित गौडा (स्पर्धेचा मानकरी), विनोद पिल्ले (बचावरक्षक) व करण ठाकूर (गोलरक्षक) यांना टीआय सायकल्सतर्फे सायकल भेट देण्यात आली.