दिल्लीवर सात विकेट्स राखून विजय, रहाणेची अर्धशतकी खेळी

गोलंदाजांचा तिखट मारा आणि मोक्याच्या क्षणी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राजझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सात विकेट्स राखून विजय मिळवला. हा सामना जिंकत पुण्याने विजयाचा दिलासा. पुण्याच्या अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी साकारत पुण्याच्या विजयाला हातभार लावला असला तरी त्याच्याकडून मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत.

दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुण्याच्या अजिंक्य रहाणे आणि उस्मान ख्वाजा (३०) यांनी ५६ धावांची सलामी दिली. अमित मिश्राच्या सातव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ख्वाजा मोठा फटका मारण्याच्या नादात यष्टीरक्षक सॅमसनने  जीवदान दिले. पण या जीवदानाचा फायदा ख्वाजाला घेता आला नाही. मिश्राने पुढच्या षटकात ख्वाजाला सॅमसनकरवी यष्टीचीत केले. इम्रान ताहिरच्या चौदाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत अजिंक्यने अर्धशतक पूर्ण केले, त्याच्या या अर्धशतकांमध्ये सहा चौकारांचा समावेश होता. पण खेळपट्टीवर स्थिरस्थावर होऊनही अजिंक्यला मोठे फटके मारण्यात अपयश येत होते. तीन षटकांमध्ये ३७ धावा हव्या असताना मोहम्मद शमीच्या १७ व्या षटकात पुण्याने २० धावांची लूट केली, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीने (२७) प्रत्येकी एक चौकार आणि षटकार लगावला होता. २ षटकांमध्ये १७ धावांची गरज असताना इमा्रन ताहिरच्या १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीचा सीमारेषेवर अप्रतिम झेल सॅम बिलिंग्सने टीपला. धोनी ताहिरचा दीडशेवा बळी ठरला. पण याच षटकात थिसारा परेराने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार लगावत संघाला विजयासमीप नेले. अजिंक्यने यावेळी ४८ चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर नाबाद ६३ धावांची खेळी साकारली.

तत्पूर्वी, पुण्याने दिल्लीला फलंदाजीसाठी पाचारण केले.  रिषभ पंतच्या (२) यष्टीचा अप्रतिम वेध अशोक दिंडाच्या चेंडूने घेतला. त्यानंतर दिल्लीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. पुण्याच्या गोलंदाजांनी त्यांच्यावर चांगलाच वचक ठेवला होता. जे.पी.डय़ुमिनी (३४) आणि करुण नायर (३२) यांनी उपयुक्त खेळी साकारल्यामुळे दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. मध्यमगती गोलंदाज रजत भाटीयाने यावेळी अचूक मारा केला.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ७ बाद १६२ ( जे.पी.डय़ुमिनी ३४, करुण नायर ३२; रजत भाटीया २/२२) पराभूत वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स : १९.१ षटकांत ३ बाद १६६ (अजिंक्य रहाणे नाबाद ६३, उस्मान ख्वाजा ३०; इमान ताहिर २/२६).