पुणेरी पलटण संघात मनजित चिल्लर, दीपक हुडा आणि अजय ठाकूर यांच्यासारखे दिग्गज खेळाडू होते, परंतु कबड्डी हा सांघिक खेळ आहे. नेमकी हीच पुण्याची उणी बाजू ठरली. बंगाल वॉरियर्सने पुण्यावर ३३-२८ अशी मात करून स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगमध्ये विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली, तर जयपूर पिंक पँथर्सने दिल्ली दबंगवर ३९-३४ अशी मात केली.
नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलात चालू असलेल्या या स्पध्रेतील पहिला सामना विलक्षण रंगला. दीपक आणि अजय हे दोन चढाईपटू अपेक्षित कामगिरी करू न शकल्यामुळे पुण्याची जबाबदारी प्रामुख्याने कर्णधार मनजितवर होती. त्याने आक्रमण आणि बचाव अशा दोन्ही बाजू सांभाळत सर्वाधिक १३ गुण वसूल केले, परंतु संघाचा पराभव तो टाळू शकला नाही. मध्यंतराला पुण्याकडे ११-१० अशी एका गुणाची आघाडी होती. मग २२व्या मिनिटाला बंगालने पहिला लोण चढवला, परंतु मनजितने बोनससहित चार गुणांची कमाई केल्यामुळे बंगालचे धाबे दणाणले आणि पुण्याने ३४व्या मिनिटाला लोणची परतफेड केली. सामना संपायला तीन मिनिटे असताना नितीन तोमरने तीन गुण घेतल्यामुळे बंगालने दुसरा लोण चढवला आणि आघाडी वाढवली. तोमरने चढायांचे ११ गुण मिळवत विजयात सिंहाचा वाटा उचलला. बाजीराव होडगे आणि गिरीश इर्नाक यांनी अप्रतिम पकडी केल्या.