दुसऱ्या सत्रात चांगले खेळा, अन्यथा बॅगा भरून घरी निघावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा पुणेरी पलटणचा कर्णधार मनजीत चिल्लरने मध्यंतराप्रसंगी संघातील खेळाडूंना दिला होता. त्याच्या या इशाऱ्याने पहिल्या सत्रात १२-२१ अशा रीतीने पिछाडीवर पडलेल्या पुण्याच्या संघाला संजीवनीच जणू मिळाली. दुसऱ्या सत्रात पुण्याने बंगळुरूच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेत ३६-३३ असा विजय मिळवला आणि प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामाची दिमाखात उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली. दुखापतीची पर्वा न करता मैदानावर उतरलेल्या मनजीतने पकडींचे सर्वाधिक ११ गुण मिळवले आणि आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली.

नवी दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमवरील साखळीच्या अखेरच्या दिवशी चौथ्या स्थानासाठी पुणे आणि यू मुंबा यांच्यात कडवी स्पर्धा होती. मात्र पुण्याने बंगळुरूला हरवून आणि यू मुंबाने दबंग दिल्लीला ३८-३४ अशा फरकाने गुणतालिकेत प्रत्येकी ४२ गुणांची कमाई केली. मात्र गुणफरकामध्ये पुण्याचा संघ मुंबईपेक्षा सरस ठरल्यामुळे त्यांनी चौथ्या स्थानावर आपला हक्क प्रस्थापित केला.

पहिल्या सामन्यात पुण्याने प्रारंभीपासून उत्तम आघाडी घेतली होती. मात्र दहाव्या मिनिटाला पुण्याच्या हातून सामन्याचे नियंत्रण सुटले आणि १६व्या मिनिटाला बंगळुरूने पुण्यावर पहिला लोण चढवला. त्यामुळे पहिल्या सत्रात त्यांना आघाडी घेता आली. पुण्याचा भरवशाचा बचावपटू रवींद्र पहेल पहिल्याच सत्रात जायबंदी झाला. मात्र दुसऱ्या सत्रात दीपक निवास हुडाने (९ गुण) आपल्या प्रेक्षणीय चढायांनी पुण्याची आघाडी वाढवण्याचा सपाटा लावला. नितीन तोमरने त्याला छान साथ दिली. पुण्याने २७व्या आणि ३७व्या मिनिटाला अनुक्रमे दोन लोण चढवून बंगळुरूच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. बंगळुरूकडून रोहित कुमारने चढायांचा तर मोहित चिल्लरने पकडींचा अप्रतिम खेळ केला.

दुसऱ्या सामन्यात यजमान दिल्लीने पहिल्या सत्रात दोन लोणसह २४-१३ अशी एकतर्फी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सत्रात मुंबईने बहारदार खेळाचे प्रदर्शन केले आणि दोन्ही लोण परतवून लावले. यू मुंबाकडून रिशांक देवाडिगाला सूर गवसला आणि त्याने १० गुण मिळवले. दिल्लीकडून प्रशांत कुमार रायने पल्लेदार चढाया केल्या.