रोमहर्षक लढतीत पुणेरी पलटण संघाने पूर्वार्धातील चार गुणांची पिछाडी भरून काढली आणि पाटणा पायरेट्स संघाला ३०-३० असे बरोबरीत रोखले. प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या हंगामात ही पहिलीच लढत बरोबरीत सुटली.
शिवछत्रपती क्रीडानगरीत गुरुवारपासून पुण्यातील प्रो कबड्डीच्या मोसमाला प्रारंभ झाला. लागोपाठ पाच सामने जिंकणाऱ्या पाटणा पायरेट्स संघाने सुरुवातीला खेळावर पकड मिळवली. उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवत १०व्या मिनिटाला पहिला लोण चढवला. त्या वेळी त्यांनी १२-४ अशी आघाडी घेतली होती. पुण्याच्या खेळाडूंनी पकडी व चढायांबाबत केलेल्या चुका त्यांच्या पथ्यावर पडल्या. एक वेळ पाटणा संघाने १४-४ अशी आघाडी वाढवली होती. मात्र लोण स्वीकारल्यानंतर पुण्याचे खेळाडू खडबडून जागे झाले. घरच्या मैदानावर प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी जिद्दीने खेळ केला. खोलवर चढाया व अचूक पकडी असा खेळ करीत त्यांनी १७व्या मिनिटाला पहिला लोण नोंदवला. पूर्वार्ध संपायला काही सेकंद बाकी असताना बरोबरी करण्याची त्यांनी संधी मिळाली होती, मात्र पाटण्याच्या प्रदीप नरवालची पकड करण्यात पुण्याचे तीन खेळाडू अपयशी ठरले. त्यामुळे नरवालने पुन्हा संघाला २०-१६ असे अधिक्य मिळवून दिले.
३०व्या मिनिटाला पाटण्याकडे
३०-२६ अशी आघाडी होती. मात्र त्यानंतर पुण्याच्या खेळाडूंना सूर सापडला. त्यांनी पकडींबाबत संयम व समन्वय ठेवला. त्यातच पाटणा संघाच्या खेळाडूंनी पकडी करण्याबाबत केलेला आततायीपणा पुण्याच्या पथ्यावर पडला. ३५व्या मिनिटाला पाटणाकडे केवळ एकच गुणाची आघाडी होती. ३६व्या मिनिटाला त्यांच्या प्रदीप नरवालने एकाच चढाईत दोन गुणांची कमाई केली. पुण्याच्या अजय ठाकूरने एकाच चढाईत दोन गुण मिळवत ३०-३० अशी बरोबरी साधली. प्रेक्षकांच्या हितासाठी बदल यंदा हे सामने बॉक्सिंग संकुलाऐवजी बॅडमिंटन संकुलात घेण्यात आले आहेत. त्यामुळे आसनक्षमतेमध्ये आठशेने वाढ झाली आहे. अर्थात तिकिटांची संख्या वाढून फ्रँचाइजींच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

हा सामना जिंकण्याची संधी आम्ही गमावली. आमच्या खेळाडूंनी थोडासा संयम ठेवला असता तर आम्ही पाच-सहा गुणांच्या फरकाने विजय मिळवला असता. बरोबरीमुळे घरच्या मैदानावर आमची सुरुवात चांगली झाली आहे. उर्वरित सामने जिंकण्याचा आमचा प्रयत्न राहील.
– अशोक शिंदे, पुण्याचे प्रशिक्षक

प्रेक्षकसंख्येत वाढ
प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या लीगचा चौथा टप्पा पुण्यात चालू असून, प्रेक्षकसंख्येत ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या हंगामाच्या पहिल्या आठवडय़ाच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. प्रो कबड्डी लीगच्या शहरी प्रेक्षकसंख्येतही ३६ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. एकूण प्रेक्षकसंख्येपैकी ३३ टक्के प्रेक्षक युवा वर्गातील आहे. स्टार स्पोर्ट्सच्या हॉटस्टारच्या माध्यमातून युवा वर्ग प्रो कबड्डी लीग मोठय़ा प्रमाणावर पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आजचे सामने
पाटणा वि. दिल्ली; पुणे वि. जयपूर
सामन्याची वेळ : ८ वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ व एचडी २, ३.