महिला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात शतकी खेळी करणाख्या हरमनप्रीत कौरवर आता बक्षिसांचा वर्षाव सुरु झाला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ५ लाखांचं इनाम जाहीर केलं आहे. विश्वचषकात हरमनप्रीतने केलेल्या खेळीमुळे पंजाबचं नाव मोठं केलं आहे. तिच्या खेळीमुळे पंजाबमधल्या अनेक मुली पुढे जाऊन क्रिकेट खेळायला लागतील, त्यासाठी तिच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी हरमनप्रीतला हे बक्षिस जाहीर केल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातर्फे सांगण्यात आलंय.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मितालीचे वडील हरमंधर सिंह यांच्याशी व्यक्तीशः संवाद साधत त्यांचं अभिनंदन केलं. उपांत्य सामन्यात हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ११५ चेंडुंमध्ये १७१ धावांची नाबाद खेळी केली होती. याच खेळीमुळे भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

अवश्य वाचा – अंतिम सामन्याआधीच महिला क्रिकेट टीमसाठी गुड न्यूज! बक्षीसांचा पाऊस सुरूच

यावेळी कॅप्टन अमरिंदर यांनी हरमनप्रीतला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. हरमनप्रीतच्या खेळीचा संपूर्ण भारत देशाला अभिमान असल्याचं यावेळी अमरिंदर यांनी सांगितलं. काही वर्षांपूर्वी पंजाब सरकारनेच हरमनप्रीत कौरला पंजाब पोलिसांमध्ये नोकरी नाकारली होती. यानंतर सचिन तेंडुलकरच्या शिफारसीमुळे हरमनप्रीत कौरला पश्चिम रेल्वेत नोकरी मिळाली.

अवश्य वाचा – नोकरी द्यायला तू हरभजन आहेस का? जेव्हा पंजाब पोलीस हरमनप्रीतला सुनावतात…