महिला विश्वचषकात भारत अंतिम सामन्यात पराभूत झाला असला तरीही पंजाबच्या हरमनप्रीत कौरने प्रत्येक भारतीयांची मनं जिंकून घेतली आहेत. सध्या पश्चिम रेल्वेच्या सेवेत असणाऱ्या हरमनप्रीत कौरने काही वर्षांपूर्वी पंजाब पोलिसांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र तत्कालीन शिरोमणी अकाली दल आणि भाजप सरकारने हरमनप्रीतचा अर्ज फेटाळला होता. तुला नोकरी द्यायला तू हरभजन सिंह आहेस का, असं पोलिस दलातल्या एका अधिकाऱ्याने उद्दाम भाषेत हरमनप्रीतला सुनावलं होतं.

मात्र पंजाबचे सध्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाब सरकारने आधी केलेली चूक सुधारायचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे हरमनप्रीत कौरला पोलिस दलात थेट पोलिस उप-अधिक्षक पदावर काम करण्याची संधी द्यायला सरकार तयार असल्याचं सांगण्यात येत आहे. हरमनप्रीत कौर पंजाबच्या मोगा जिल्ह्यातली रहिवासी आहे.

उपांत्य आणि अंतिम फेरीत आपल्या कामगिरीने हरमनप्रीतने पंजाबच नाव मोठं केलं आहे. त्यामुळे तिच्या कामगिरीचा योग्य तो गौरव करण्यात येईल. तसेच आगामी काळात सरकार आपल्या क्रीडा धोरणात जास्तीत जास्त बदल करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्री अमरिंदरसिंह बादल यांनी केलंय. यावेळी कॅप्टन अमरिंदर यांनी हरमनप्रीतला तिच्या कामगिरीबद्दल ५ लाखांचं इनामही जाहीर केलं, तसेच तिच्या वडिलांशी फोनवरुन संवाद साधत; यापुढे जी काही मदत लागेल ती करण्याचं आश्वासनही दिलं आहे.

हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या शतकी खेळीमुळे भारताला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं होतं. त्यातचं अंतिम फेरीतली हरमनप्रीत कौरने पुनम राऊत सोबत ९५ धावांची भागादारी करत अर्धशतक झळकावलं होतं. मात्र तिची ही खेळी भारताला विश्वचषक जिंकवून देण्यात तोकडीच ठरली होती.