रिओ ऑलिम्पिकच्या महिला बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मारिन यांचा अंतिम फेरीचा सामना भारतात तब्बल १ कोटी ७० लाखांहून अधिक प्रेक्षकांनी टेलिव्हिजन पाहिल्याची माहिती प्रसारणकर्त्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीकडून जारी करण्यात आली आहे. पी.व्ही.सिंधूला अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मारिनकडून पराभवाला सामोरे जावे लागले. सिंधूला स्पर्धेत रौप्यपदक मिळाले.

वाचा: टेन स्पोर्ट्स चॅनेलसाठी सोनी पिक्चरने मोजले २५७९ कोटी

भारतात या सामन्याला एकूण १ कोटी ७० लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले. हा सामना त्यादिवशी टेलिव्हिजनवर सर्वाधिक व्ह्युज मिळालेला सामना ठरला आहे. याशिवाय क्रिकटेतर खेळांमध्ये सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सामन्यांमध्येही पी.व्ही.सिंधूच्या सामन्याने अव्वल स्थान गाठले आहे, अशी माहिती स्टार इंडियाने प्रकाशित केली आहे.

वाचा: …हे पाच क्रिकेटपटू ऑलिम्पिकमध्ये खेळले तर

पी.व्ही.सिंधूचा अंतिम सामना हॉटस्टार या मोबाईल अॅप्लिकेशनवर एकूण ५० लाखांहून अधिक जणांनी लाइव्ह पाहिल्याचेही सांगण्यात आले आहे. यासोबत यंदाच्या ऑलिम्पिकच्या प्रक्षेपणाला भारतात सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचाही दावा स्टार स्पोर्ट्सने केला आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यावेळी भारतात १९ कोटींपेक्षाही जास्त लोकांनी टेलिव्हिजनवर, तर १ कोटींहून अधिक जणांनी रिओचे प्रक्षेपण ऑनलाईन स्वरुपात पाहिल्याचे स्टार स्पोर्ट्सने म्हटले आहे.