किदम्बी श्रीकांत, साईप्रणीतची आगेकूच

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या क्रमवारीत दोन स्थानांनी आगेकूच करीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

गेल्या आठवडय़ात सिंधूची पाचव्या स्थानावर घसरण झाली होती. मात्र नुकत्याच झालेल्या सिंगापूर खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेची उपांत्यपूर्व फेरी गाठून सिंधूने तिसरा क्रमांक गाठला आहे. दोन आठवडय़ांपूर्वी २१ वर्षीय सिंधूने कारकीर्दीतील सर्वोत्तम अशी भरारी घेताना दुसरे स्थान प्राप्त केले होते. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालनेही एका स्थानाने आगेकूच करताना आठवा क्रमांक गाठला आहे.

पुरुष एकेरीत सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पध्रेतील उपविजेता किदम्बी श्रीकांत आणि विजेता बी. साईप्रणीत या दोघांनीही प्रत्येकी आठ स्थानांनी आगेकूच करीत अनुक्रमे २१व्या आणि २२व्या स्थानावर मजल मारली आहे. अजय जयराम हा या क्रमवारीतील भारताचा अग्रेसर खेळाडू असून, तो १३व्या स्थानावर आहे.

कश्यप, हर्षिलच्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात

चांगझोऊ : माजी राष्ट्रकुल विजेता बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपसह युवा मुंबईकर हर्षिल दाणी यांना चायना मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. या दोघांच्या पराभवामुळे स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर येथे सुमारे एक तास १६ मिनिटे रंगलेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात तिसऱ्या मानांकित क्युआओ बिनने कश्यपचा २१-१०, २०-२२, २१-१३ असा पराभव केला. खांद्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर कश्यपने या स्पध्रेद्वारे पुनरागमन केले आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीगदरम्यान कश्यपला दुखापत झाली होती. अन्य लढतीत चीनच्या सन फेइक्सिआंगने हर्षिलवर २१-१७, २१-१८ अशी मात केली.

 

रामोसचा सनसनाटी विजय; मरे पराभूत

पॅरिस : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अँडी मरेला माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. स्पेनच्या अल्बर्ट रामोसने मरेवर २-६, ६-२, ७-५ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. कोपऱ्याला झालेल्या दुखापतीतून सावरत मरेने पाच आठवडय़ानंतर पुनरागमन केले. पहिल्या फेरीत मरेला पुढे चाल मिळाली होती. रामोसविरुद्धच्या लढती मरेने पहिला सेट जिंकत आश्वासक सुरुवात केली.  मात्र जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानी असलेल्या आणि १५व्या मानांकित रामोसने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये झंझावाती खेळासह बाजी मारली. मरेने एक मॅचपॉइंट वाचवला मात्र रामोसने चिवटपणे खेळ करत बाजी मारली. काही दिवसांवर आलेल्या फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या दृष्टीने मरेसाठी ही स्पर्धा उत्तम व्यासपीठ होते. मात्र दुखापतीमुळे मरेच्या खेळावर परिणाम झाल्याचे या पराभवाने स्पष्ट झाले. पुढच्या लढतीत रामोससमोर मारिन चिलीचचे आव्हान असणार आहे. अन्य लढतीत उरुग्वेच्या पाब्लो क्युव्हेसने स्टॅन वॉवरिन्काचे आव्हान ६-४, ६-४ असे संपुष्टात आणले.