ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करणारी बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिचे लक्ष्य आता आगामी बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेकडे आहे. क्रमवारीपेक्षा मी कामगिरीवर जास्त लक्ष देते, पण कामगिरीत मी सातत्य ठेवू शकले तर एक दिवस नक्कीच नंबर एकची खेळाडू होईन, असा आत्मविश्वास सिंधूने व्यक्त केला.

सिंधू इंडियन ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद पटकावल्यानंतर बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती. पण गेल्या आठवड्यात सिंधूला सिंगापूर ओपन सुपर सीरिजमध्ये उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सिंधूच्या क्रमवारीत एका स्थानाची घसरण होऊन ती आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

सिंधू म्हणाली की, ”पराभव हा वाट्याला येतच असतो. तुम्ही अनेकदा जिंकता आणि तितकेच वेळा पराभूत देखील होता. प्रत्येकवेळी तुम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत राहिलात तर नक्कीच क्रमवारीत सुधारणा होते. त्यामुळे मी क्रमवारी सुधारण्यावर नाही, तर कामगिरीवर जास्त लक्ष देते.”

सिंधू सध्या २५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी तयारी करत असून त्यानंतर मे महिन्यात होणाऱ्या सुदीरमन कपमध्येही खेळणार आहे. सिंधूने इंडियन ओपन सुपर सीरिजमध्ये स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिला पराभूत करून स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. मारिनने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधूवर मात करून सुवर्णपदकाची कमाई केली होती, तर सिंधूला रौप्य पदक मिळाले होते.