भारताच्या किदम्बी श्रीकांत व पी. व्ही. सिंधू यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिलांच्या एकेरीत विजयी सलामी केली. मात्र पदकाच्या आशा असलेल्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांना महिला दुहेरीत पराभवाचा धक्का बसला.
थायलंड ओपन विजेता श्रीकांत याने स्लोवेनियाच्या इजनोक उत्रासाचा २१-११, ११-२१, २१-१२ असा पराभव केला. चुरशीच्या या लढतीत श्रीकांतने पहिल्या व तिसऱ्या गेममध्ये स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा सुरेख खेळ केला. दुसऱ्या गेममध्ये त्याला सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवता आले नाही. तिसऱ्या गेममध्ये त्याने चतुरस्र खेळ करीत विजयश्री खेचून आणली. अजय जयराम याला जपानच्या केनिची तागोकडून पुढे चाल मिळाली. केनिचीने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली.
सिंधूने रशियाच्या ओल्गा गोलोव्हानोवाचा २१-१२, २१-१७ असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये सिंधूने ड्रॉपशॉट्सचा कल्पकतेने उपयोग केला. दुसऱ्या गेममध्ये ओल्गाने चांगली लढत दिली, मात्र सिंधूने परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवीत विजय मिळविला.
दुहेरीत जागतिक कांस्यपदक विजेत्या ज्वाला व अश्विनी यांच्यावर भारताची मदार होती, मात्र पाचव्या मानांकित कियांग तियांग व युनलेई झाओ (चीन) यांच्या वेगवान खेळापुढे त्यांचा बचाव निष्फळ ठरला. हा सामना चीनच्या जोडीने २१-१६, २१-९ असा जिंकला.
मनु अत्री व सुमेध रेड्डी यांनी पुरुषांच्या दुहेरीत दोन सामने जिंकून अपराजित्व राखले. त्यांनी पंधराव्या मानांकित हिरोकात्सु हाशिमोतो व नोरीयासु हिराता यांच्यावर २१-१९, २१-१९ असा सनसनाटी विजय नोंदविला. त्याआधी त्यांनी निकित खालियोव्ह व व्हॅसिली कुझ्नेत्सोवा यांचे आव्हान २१-१९, २१-२३, २१-१९ असे संपुष्टात आणले होते.