जपानच्या मिनात्सू मितानीवर विजय * यंदाच्या सत्रातील पहिले जेतेपद
सातत्यपूर्ण खेळ आणि प्रतिस्पर्धी खेळाडूवर वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने कोर्टावर उतरलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पध्रेचे जेतेपद आपल्या नावावर केले. सलग तिसऱ्यांदा तिने या स्पध्रेत अजिंक्यपद पटकावण्याची किमया साधली. अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या मिनात्सू मितानीचे कडवे आव्हान २१-९, २१-२३, २१-१४ असे परतवून जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली. यापूर्वी सिंधूने २०१३ व २०१४ साली येथे जेतेपदाची कमाई केली होती.
यंदाच्या वर्षांतील तिचे हे पहिलेच जेतेपद आहे. जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या सिंधूने एक तास सहा मिनिटे चाललेल्या सामन्यात मिनात्सूचा पराभव केला. सिंधूने दमदार स्मॅश आणि परतीच्या फटक्यांनी जपानच्या खेळाडूला हतबल केले. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचा सामना झाल्याने मिनात्सू थोडीशी गांगरली. त्याचा फायदा उचलत सिंधूने पहिल्या गेममध्ये ११-५ अशी निर्णायक आघाडी घेतली. त्यानंतर मिनात्सूला केवळ चार गुण मिळवण्यात यश आल्याने सिंधूने हा गेम २१-९ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये मिनात्सूकडून जबरदस्त खेळ झाला. तिने आपल्या खेळातील काही त्रुटींवर मात करत सिंधूला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. सिंधूने गुणांचे खाते उघडले खरे, परंतु तिचे लक्ष विचलित झाले आणि मिनात्सूने ४-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूने अप्रतिम स्मॅश लगावत ७-४ असे पुनरागमन केले. सामन्यातील चुरस अधिकाधिक वाढत होती आणि कधी सिंधू, तर कधी मिनात्सू आघाडीचा आनंद उपभोगत होते. बेसलाईनचा अंदाज चुकल्याने सिंधूला फटका बसला आणि मिनात्सूकडे पुन्हा आघाडी आली. हा गेम १६-१६ व १९-१९ असा अटीतटीचा रंगला होता.
सिंधूला दोन वेळा मॅचपॉइंटची संधी मिळाली होती, परंतु तिला अपयश आले. मिनात्सूने मात्र एकाच संधीत अचूक खेळ करून दुसरा गेम २३-२१ असा नावावर केला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने अपेक्षेप्रमाणे ११-७ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सलग आठ गुणांची कमाई करत ही आघाडी अधिक मजबूत केली. मिनात्सूने एव्हाना पराभव पत्करला होता. त्यामुळे सिंधूने हा गेम २१-१४ असा नावावर करून जेतेपदावर कब्जा केला.

या स्पध्रेतील कामगिरी समाधानकारक झाली. अंतिम सामन्यात पहिला गेम सोपा होता, परंतु दुसऱ्या गेममध्ये मितानीने झुंज दिली. या गेममध्ये विजयाची संधी होती, मात्र अपयश आल्याने निराश झाले. दरम्यान तिसऱ्या गेममध्ये आघाडी घेत विजय निश्चित केला. जपान खुल्या स्पध्रेत मितानीकडून पराभूत झाले होते. त्यामुळे मकाऊमध्ये तिला हरविल्याने आनंद झाला आहे.
– पी. व्ही. सिंधू

* सायना नेहवालनंतर भारतीय बॅडमिंटन विश्वाचे आशास्थान असलेल्या युवा पी.व्ही. सिंधूने मकाऊ बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
* मकाऊ स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्ट्रिक नोंदवताना सिंधूने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केल्यानंतर यंदाच्या वर्षांत सिंधूची कामगिरी लौकिकाला साजेशी होत नव्हती.
* संस्मरणीय आठवणी असलेल्या मकाऊ स्पर्धेच्या जेतेपदासह सिंधूने यंदाच्या हंगामातील पहिल्यावहिल्या जेतेपदावर कब्जा केला. –