ऑलम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जपानच्या आया ओहोरी हिच्यावर २१-१४, २१-१५ असा सहज विजय प्राप्त करत सिंधूने स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ४० मिनिटं रंगलेल्या या सामन्यात सिंधूने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. आशियाई चॅम्पियनशीपमध्ये आता सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू राहिली आहे. याआधी सायना नेहवाल हिचं स्पर्धेतील आव्हान केव्हाच संपुष्टात आलं आहे. सिंधूची स्पर्धेतील कामगिरी पाहाता ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूची चीनच्या बिंजिओ हिच्याशी लढत होणार आहे.

दुसरीकडे, पुरूष एकेरीत अजय जयराम याचे आव्हान स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. चीनच्या ह्यू जेन होओ विरुद्धच्या लढतीत जयराम याचा १९-२१, १०-२१ असा पराभव झाला.