सुदीरमन चषक बॅडमिंटन स्पर्धा

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने नोंदविलेल्या विजयाचा अपवाद वगळता भारताला सुदीरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत डेन्मार्कविरुद्ध निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले. डेन्मार्कने हा सामना ४-१ असा जिंकला.

साखळी गटातील पहिल्या सामन्यात दोन वेळा उपविजेता असलेल्या डेन्मार्कविरुद्ध भारताला फारशा यशाची अपेक्षा नव्हती. पहिल्या लढतीत भारताच्या अश्विनी पोनप्पा व सात्विकसाईराज रान्कीरेड्डी यांना मिश्रदुहेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यांना लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जॉकिम निल्सेन व ख्रिस्तिना पेडरसन यांनी २१-१५, २१-१६ असे पराभूत केले. पाठोपाठ भारताच्या अजय जयरामवर व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनने २१-१२, २१-७ अशी सहज मात करीत डेन्मार्कला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

पुरुषांच्या दुहेरीत माजी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते मथायस बोई व कर्स्टन मोगेन्सन यांनी रिओ ऑलिम्पिकपटू मनू अत्री व बी. सुमेध रेड्डी यांचा २१-१७, २१-१५ असा पराभव केला.

सिंधूने लिने केजेर्सफेल्डवर मात करीत भारताची लाज राखली. तिने हा सामना २१-१८, २१-६ असा जिंकला व डेन्मार्कला निर्विवाद विजयापासून वंचित ठेवले.

महिलांच्या दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांनी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या कॅमिला जुहेल व ख्रिस्तिना पेडरसन यांना चिवट झुंज दिली. हा सामना डेन्मार्कच्या जोडीने १८-२१, २१-१५, २३-२१ असा रोमहर्षक लढतीनंतर जिंकला.

भारताची साखळी गटातील दुसऱ्या लढतीत माजी विजेत्या इंडोनेशियाबरोबर गाठ पडणार आहे. हा सामना बुधवारी होणार आहे.