रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन क्रीडाप्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने तीन वर्षांसाठी ५० कोटी रुपयांचा करार केला आहे. एवढा मोठा करार करणारी देशातील ती एकमेव क्रिकेटबाह्य खेळाडू आहे. स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपनी बेसलाइनशी तिने हा करार केला आहे. भारतीय बॅडमिंटनपटूसाठीचा हा उत्तम करार असल्याचे सांगितले जाते. तिच्या लोकप्रियतेमुळे अनेक कंपन्या तिच्याकडे आकर्षित झाल्या आहेत. कंपनी आता तिचे ब्रॅण्ड प्रोफाईलिंग, लायसेन्सिंग, एण्डॉर्समेंट इत्यादी गोष्टींचे काम पाहणार असल्याचे बेसलाइनचे व्यवस्थापकीय संचालक तुहीन मिश्रा यांनी सांगितल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात म्हटले आहे. १६ कंपन्या सिंधूला आपल्यासोबत जोडण्यास उत्सुक असल्याचे सांगितले जाते. यातील नऊ कंपन्यांसोबतचे डील अंतिम टप्प्यात असल्याची माहिती तुहीन मिश्रा यांनी दिली. ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करून परतल्यापासून अनेकांनी तिच्याशी संपर्क साधला आहे. पुढील आठवड्यापर्यंत नऊ कंपन्यांशी करार होण्याची शक्यता आहे. इतरांच्याबाबत अद्याप निर्णय घेणे बाकी असल्याचे मिश्रा म्हणाले. असे असले तरी अद्याप याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. आपले प्रशिक्षक गोपीचंद यांच्याप्रमाणेच सिंधूनेदेखील कोला पेयाच्या जाहिरातसाठी नकार दिला आहे. जाहिरातींच्या चित्रीकरणास आपल्या बॅडमिंटनच्या सरावात येऊ देणार नसल्याचे सिंधून खुलासा केला आहे.

करारानुसार दरवर्षी सिंधूला एक ठराविक रक्कम मिळणार असून, बाकीची रक्कम एण्डॉर्समेन्टनुसार मिळणार आहे. पी. व्ही. सिंधूने रिओ ऑलिंम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला असून, भारतासाठी बॅडमिंटनमधील ही सर्वात मोठी कामगिरी आहे. याआधी २०१२ मध्ये सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. ऑलिम्पिकपूर्वी सिंधूने कठोर परिश्रम घेतले होते. अनेक महिने ती मोबाइल आणि आइस्क्रिमपासून दूर होती. ऑलिम्पिक पदकासोबतच सिंधूने ‘वर्ल्ड चॅन्पियनशिप’मध्ये दोनदा कांस्यपदक जिंकले असून, ‘ग्रँण्ड प्रिस्क’ किताब जिंकण्याची तिला ओढ आहे.