भोपाळच्या कमरपाशा इलेव्हनने आगाखान करंडक अखिल भारतीय निमंत्रित हॉकी स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली. त्यांनी अंतिम लढतीत हैद्राबादच्या स्टेट बँक ऑफ हैद्राबाद संघावर ४-२ अशी मात केली.
मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भोपाळच्या संघाने सुरुवातीपासून सामन्यावर नियंत्रण मिळविले होते. पूर्वार्धात त्यांनी ४-० अशी आघाडी घेतली होती. भोपाळकडून ओसाफा रहेमान याने दोन गोल करीत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
उत्तरार्धात हैद्राबादने दोन गोल करीत सामन्यात रंगत आणली मात्र या दोन गोलांवरच त्यांना समाधान मानावे लागले.
भोपाळच्या खेळाडूंनी पूर्वार्धात वेगवान चाली केल्या. दहाव्या मिनिटालाच त्यांना गोल करण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत शाकीर हुसेन याने गोल करीत संघाचे खाते उघडले.
२७ व्या मिनिटाला त्यांना गोल करण्याची आणखी एक संधी प्राप्त झाली. मिराज उद्दीन याने दिलेल्या पासवर मुबीन रहेमान याने गोल करीत संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात भोपाळने आणखी दोन करीत आपली बाजू बळकट केली. ३१ व्या मिनिटाला ओसाफ याने मुबीर रहेमानच्या पासवर गोल केला. ३५ व्या मिनिटाला त्यांना आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत ओसाफ याने स्वत:चा दुसरा व संघाचा चौथा गोल केला.
उत्तरार्धात प्रारंभापासूनच हैद्राबादने जोरदार चाली केल्या. सामन्याच्या ३७ व्या मिनिटाला त्यांच्या हरिओम रेड्डी याने गोल करीत संघाचे खाते उघडले. पुन्हा ४८ व्या मिनिटाला त्याने जोरदार मुसंडी मारली व संघाचा दुसरा गोल केला. त्यानंतर मात्र भोपाळच्या खेळाडूंनी भक्कम बचाव करीत प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या चाली रोखल्या. भोपाळ संघास सात पेनल्टी कॉर्नर मिळाले तर हैद्राबाद संघाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले.