अफलातून फिरकी आणि मैदानात टीच्चून फलंदाजी करण्यात हातखंडा असलेला रवीचंद्रन अश्विन भारतीय संघाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. भारतीय संघाच्या प्रत्येक सामन्यात अश्विनची कामगिरी फार महत्त्वाची असते. कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू अश्विनच्या फिरकीचा नेहमी भीती बाळगून असतात. वेगवान गोलंदाजांकडून निराशा होत असताना अश्विनने नेहमीच संघाला अनेकदा यश मिळवून दिले आहे. सध्या इंग्लंडविरुद्धच्या वानखेडे कसोटीत देखील अश्विनने संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. वानखेडेच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांच्या पदरात अपयश आले असताना अश्विनने आपली फिरकी जादू दाखवून एकाच डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.

पाहा: भारत विरुद्ध इंग्लंड वानखेडे कसोटीचे लाइव्ह अपडेट्स

अश्विनच्या खात्यात आजवर अनेक विक्रमांची नोंद झाली असून आज देखील अश्विनने एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. अश्विनने पाच विकेट्स घेऊन एकाच डावात पाच विकेट्स घेण्याच्या माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. अश्विनने तब्बल २३ वेळा एकाच डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. याआधी कपिल देव यांनीही एकाच डावात २३ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने आगामी काळात कपिल देव यांचा हा विक्रम मोडीत काढून नवा उच्चांक गाठेल अशी आशा आहे.
वानखेडेवर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत अश्विनने कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या चार फलंदाजांना माघारी धाडले होते. त्यानंतर दुसऱया दिवसाच्या सुरूवातीलाच तिसऱया षटकात इंग्लंडच्या बेन स्टोक्सला माघारी धाडून आपल्या खात्यात पाचवी विकेट जमा केली आणि कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी साधली.

वाचा: ‘वानखेडेची खेळपट्टी सामन्याच्या दुसऱया दिवसापासून फिरकीला साथ देईल’