दुखापतींनी शरीराला दिलेला वेढा सुटल्यावर नव्या ऊर्जेने खेळणाऱ्या राफेल नदालने तडफदार अलेक्झांडर झरेव्हचे चिवट आव्हान मोडून काढत थरारक विजय मिळवला. नदालप्रमाणेच डॉमिनिक थिइम, गेइल मॉनफिल्स, मिलास राओनिक यांनीही चौथी फेरी गाठली. महिलांमध्ये सेरेना विल्यम्ससह एकाटेरिना माकारोव्हा, जोहाना कोन्ता, कॅरोलिन प्लिसकोव्हा यांनी चौथ्या फेरीत आगेकूच केली.

३० वर्षीय नदालने १९ वर्षीय अलेक्झांडर झरेव्हला ४-६, ६-३, ६-७ (५-७), ६-३, ६-२ असे नमवले. सहाव्या मानांकित मॉनफिल्सने फिलीप कोहलश्रायबरचा ६-३, ७-६ (७-१), ६-४ असा पराभव केला. आठव्या मानांकित डॉमिनिक थिइमने बेनॉइट पेअरवर ६-१, ४-६, ६-४, ६-४ अशी मात केली. मिलास राओनिकने गाइल्ड सिमोनवर ६-२, ७-६ (७-५), ३-६, ६-३ असा विजय मिळवला.

२२ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या द्वितीय मानांकित सेरेना विल्यम्सने निकोल गिब्सवर ६-१, ६-३ अशी मात केली. जोहाना कोन्ताने कॅरोलिन वोझ्नियाकीवर ६-३, ६-१ अशी मात केली.

सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी आपापल्या सहकाऱ्यांसह खेळताना मिश्र प्रकारात दुहेरी फेरी गाठली. सानिया आणि इव्हान डोडिग जोडीने लौरा सिगमंड आणि मेट पॅव्हिक जोडीवर ७-५, ६-४ अशी मात केली. रोहन आणि गॅब्रिएला डाब्रोव्हसकी जोडीने मायकेल व्हीनस आणि कतारिना स्र्बोटनिक जोडीला ४-६, ७-६ , १०-७ असे नमवले.

 

पुजाराची एकाकी झुंज; शेष भारत ९ बाद २०६गुजरातच्या ३५८ धावा

मुंबई : इराणी चषक क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस गुजरातने गाजवला, अपवाद ठरला तो फक्त शेष भारत संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजारा. गुजरातने चिराग गांधीच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३५८ धावांची मजल मारली. त्यानंतर शेष भारत संघाची पहिल्या डावात ९ बाद २०६ अशी अवस्था त्यांनी केली आहे. त्यामुळे गुजरातचा संघ आघाडी समीप आहे. पुजाराने या वेळी एकाकी झुंज देत संघाचे आव्हान टिकवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला शतक झळकावण्यात अपयश आले. दुसऱ्या दिवसअखेर शेष भारत संघ १५२ धावांनी पिछाडीवर असून त्यांची शेवटची जोडी मैदानात आहे.

चिरागने २२ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर १६९ धावा केल्या. शेष भारत संघाकडून कौलने पाच आणि वेगवान गोलंदाज पंकज सिंगने चार बळी मिळवले.

अखिलनंतर करुण नायर (२८), मनोज तिवारी (१२) आणि वृद्धिमान साहा (०) असे भारतीय संघाचा अनुभव असलेले फलंदाज होते, पण या तिघांनीही निराशा केली. पुजाराने ११ चौकारांच्या जोरावर ८६ धावांची खेळी साकारली. गुजरातकडून चिंतन गाजा आणि पटेल यांनी प्रत्येक तीन बळी मिळवले.