चिपलकट्टी स्मृती बॅडमिंटन स्पर्धा

थायलंडच्या कुनलावूत विदितसर्नने भारताच्या राहुल भारद्वाजचा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला आणि सुशांत चिपलकट्टी स्मृती कनिष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष गटात अजिंक्यपद मिळवले. महिलांमध्ये थायलंडच्याच पातरसुदा चैवानला विजेतेपद मिळाले.

मॉडर्न क्रीडा संकुलात लक्ष्मी क्रीडा मंदिर बॅडमिंटन ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेत विदितसर्नने अव्वल दर्जाला साजेसा खेळ करीत भारद्वाजला २१-१६, २१-११ असे हरवले. त्याने ३३ मिनिटांच्या खेळात स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांबरोबरच प्लेसिंगचा बहारदार खेळ केला. भारद्वाजने पहिल्या गेममध्ये चांगली लढत दिली, मात्र नंतर दुसऱ्या गेममध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाही. विदितसर्नला दुहेरी मुकूट मिळवता आला नाही. कारण पुरुषांच्या दुहेरीत विदितसर्न व पाचरपोल निपोर्नराम यांना रिनोव रिवॉल्डी व रिहान कुशराजांतो या इंडोनेशियाच्या जोडीकडून ९-२१, १३-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.

चैवानने महिलांच्या अंतिम लढतीत जपानच्या मोतो हायाशीवर २१-१९, २१-१२ असा विजय नोंदविला. अव्वल मानांकित चैवानला पहिल्या गेममध्ये झुंजावे लागले. तिने ड्रॉपशॉट्सबरोबरच कॉर्नरजवळ परतीचे फटके मारत हा सामना जिंकला. पहिल्या गेममध्ये मोतोने स्मॅशिंगच्या सुरेख फटक्यांचा उपयोग केला. मात्र दुसऱ्या गेममध्ये तिला परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही.

महिलांच्या दुहेरीत दक्षिण कोरियाच्या मिन जेईकिम व एहा युआंग सिओंग यांनी विजेतेपदावर मोहोर उमटवली. त्यांनी अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या अगाथा ईमॅन्युएला व सिती रामाधांती यांचा २१-१५, २१-१९ असा पराभव केला. मिश्रदुहेरीच्या अंतिम लढतीत जपानच्या ताकुमा ओबायाशी व नात्सु सायतो यांनी इंडोनेशियाच्या रिनोव रिवॉल्डी व अँजेलिना विरातामा यांना १८-२१, २१-१६, २१-१७ असे पराभूत केले.