डब्ल्यूडब्ल्यूईच्या व्यासपीठावर महाराष्ट्राचा मल्ल राहुल बोडके

‘‘आजोबा कुस्ती खेळायचे, बाबांनी काही वर्षे कुस्तीचे मैदान गाजवले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे वडिलांनी टॅक्सी चालवायचा निर्णय घेतला. त्यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा; पण वडिलांना जे करता आले नाही, ते स्वप्न त्यांनी माझ्यामध्ये पाहिले आणि आता ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ‘डब्ल्यूडब्ल्यूई’मध्ये पहिला महाराष्ट्राचा मल्ल होण्याचा मान मला लवकरच मिळणार आहे, यानिमित्ताने मराठी माणसाचे पाऊल नक्कीच या आखाडय़ातही पडेल,’’ अशी भावना नाशिकच्या राहुल बोडकेने व्यक्त केली.

‘‘टॅक्सी चालवताना बाबा काही पैसे माझ्यासाठी जपून ठेवायचे. मी लहानपणी आखाडय़ात तालमीत जायला लागलो. एका मोठय़ा कुस्तीपटूच्या घरी स्वयंपाकाचे काम करायचो. त्यानंतर जे काही अन्न उरेल, त्यावर गुजराण करायचो. परिपूर्ण असा आहार नव्हताच, पण काही तरी करून दाखवायची जिद्द होती. २०१४ मध्ये मी महाराष्ट्र केसरी झालो. त्यानंतर कर्नाटक आणि हिंद केसरी स्पर्धाही जिंकली; पण जास्त काही हाती लागले नाही. सुविधा नव्हत्याच. चांगल्या आहारासाठी पैसाही गाठीशी नव्हता. एकदा ‘डब्ल्यूडब्ल्यूई’चा व्हिडीओ पाहिला आणि मी यासाठीच बनलो आहे, असे वाटू लागले. भारतातील चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होऊन आता दुबईत चाचणीसाठी आलो आहे,’’ असे राहुलने या वेळी आत्मविश्वासाने सांगितले.

‘‘पहिले ऑलिम्पिक पदकविजेते खाशाबा जाधव, दारा सिंग, कर्तार सिंग, हरिशचंद्र बिराजदार यांना आदर्शवत मानत मी कुस्ती खेळायला लागलो. शाळेत असताना मातीत कुस्ती व्हायची. त्यानंतर मॅटवर आलो. त्यामुळे इथे मला कुठलीही समस्या जाणवत नाही. रोज लहानपणापासून जो व्यायाम करत होतो ते पाहून इथले प्रशिक्षक आश्चर्यचकित झाले, कारण त्यांच्याकडे एवढा परिपूर्ण व्यायाम करत नाहीत. आपल्या बैठका आणि सूर्यनमस्कार यांच्या तर ते प्रेमातच पडले आणि आता इथल्या सर्वानाच मी या गोष्टी शिकवत आहे,’’ असे राहुल सांगत होता.

‘‘आपल्या महाराष्ट्रात फार चांगली गुणवत्ता आहे, पण सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे ती गुणवत्ता मोठय़ा स्तरावर आपल्याला दिसत नाही. ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे त्यांच्यासाठी सरकारने व्यवस्थित नियोजन करायला हवे. त्यांचे प्रशिक्षण, आहार, मूलभूत सुविधा यांच्यावर भर द्यायला हवा. राज्यस्तरीय आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंसाठी बरेच काही करता येऊ शकते, पण तसे आपल्याकडे होताना दिसत नाही आणि त्यामुळे खेळाडूंना नैराश्य येते, पण जर चांगल्या सुविधा मिळाल्या तरच भारतातील गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहता येऊ शकेल,’’ असे राहुलने महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल पोटतिडिकीने सांगितले.

‘‘मी जेव्हा हिंद केसरी झालो, तेव्हा महाराष्ट्रातून जास्त पाठिंबा मिळाला नाही. एका साखर कारख्यानात मी काम करत होतो; पण ते करताना कुस्तीमधील गुणवत्ता वाया जात असल्याचे मला दिसून आले. त्यामुळे ठरवले की, गुणवत्तेला न्याय देण्यासाठी कुठलीही नोकरी करायची नाही, कारण नोकरी केली असती तर त्यामध्येच गुरफटून गेलो असतो. आणि त्यामुळे मी ‘डब्ल्यूडब्ल्यूई’कडे वळलो. आता दुबईमध्ये चाचणी सुरू आहे. त्यामध्ये माझी नक्कीच निवड होईल,’’ असा आत्मविश्वास राहुलने व्यक्त केला.