भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शनिवारी झालेल्या सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीनंतर भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्याकडे भारतीय ‘अ’ आणि १९-वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. परंतु बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाचे संचालक म्हणून जाणाऱ्या रवी शास्त्री यांच्या भवितव्याबाबत संभ्रम अद्याप कायम आहे.
‘‘भारताचा ‘अ’ संघ आणि १९-वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास राहुल द्रविड तयार झाले आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे,’’ अशी माहिती बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ईडन गार्डन्सवरील बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. निवृत्त क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांचा या समितीत समावेश आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमियासुद्धा या बैठकीला हजर होते.
४२ वर्षीय द्रविड यांनी १६४ कसोटी आणि ३४४ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताच्या प्रशिक्षकपदासाठी द्रविड यांच्या नावाची चर्चा होती. परंतु कौटुंबिक कारणास्तव त्यांनी अनुत्सुकता दर्शवली आहे. मात्र पुढील पिढीच्या भारतीय संघाला घडवण्याची जबाबदारी मात्र त्यांनी तत्परतेने स्वीकारली आहे. त्यामुळे ते भारतीय ‘अ’ संघासोबत परदेश दौऱ्यावरसुद्धा जातील.
शास्त्री यांच्याबाबत मात्र विविध चर्चा अद्याप सुरू आहेत. कारण बांगलादेश दौऱ्याअखेपर्यंत बीसीसीआयने संघ संचालक पदाची जबाबदारी शास्त्री यांच्याकडेच कायम ठेवली आहे.
‘‘शास्त्री यांच्या भवितव्याबाबत बराच ऊहापोह सुरू आहे. परंतु ते तुम्ही आमच्यावर सोडा. सल्लागार समिती लवकरच आपल्या शिफारसी देईल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल. तोवर तरी सध्याच्या रचनेत कोणताही बदल केला जाणार नाही,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.
सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत भारतीय ‘अ’ संघाचे अधिकाधिक परदेश दौरे व्हावेत, अशी सूचना करण्यात आली. याबाबत ठाकूर म्हणाले, ‘‘भारतीय ‘अ’ आणि युवा संघाची कामगिरी सुधारण्यासाठी अनेक प्रशिक्षक, फिजिओ आणि सरावतज्ज्ञ नेमण्यात येतील. याचप्रमाणे गरज भासल्यास सचिन, द्रविड आणि गांगुलीसुद्धा भारतीय क्रिकेटसाठी आपला वेळ देतील.’’
लोकेश राहुलची
बांगलादेश दौऱ्यातून माघार
कोलकाता : डेंग्यूच्या आजारपणामुळे कर्नाटकचा गुणी सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलने बांगलादेश दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघातून माघार घेतली आहे.२३ वर्षीय राहुलने मेलबर्नला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. मात्र १० जूनपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी तो खेळणार नसल्याचे शनिवारी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तूर्तास तरी त्याच्याऐवजी बदली खेळाडू देण्यात आलेला नाही.
बांगलादेश दौऱ्यानंतर बीसीसीआयशी चर्चा -शास्त्री
नवी दिल्ली : रवी शास्त्री यांना बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या संचालकपदी कायम ठेवण्यात आले आहे. मात्र या दौऱ्यानंतर या भूमिकेविषयी बीसीसीआयशी चर्चा करणार असल्याचे शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे. ‘‘बांगलादेश दौऱ्यापर्यंत मी संचालकपदी असणार आहे. त्यानंतर शांतपणे बसून बीसीसीआयशी बोलणी करणार आहे. तूर्तास बांगलादेश दौरा यशस्वी करणे हे माझे लक्ष्य आहे,’’ असे शास्त्री यांनी सांगितले. कसोटी कर्णधार विराट कोहलीने माझ्या कामाची केलेली प्रशंसा सुखावणारी आहे. मात्र माझ्या बरोबरीने काम करणाऱ्या प्रशिक्षक आणि सहयोगींचा संघाच्या यशात मोठा वाटा आहे, असे शास्त्री यांनी पुढे सांगितले.