आयपीएल हे ज्ञानाच्या आदान-प्रदानाचे मोठे केंद्र आहे. आयपीएलमध्ये विविध परंपरा आणि संस्कृतींमधील खेळाडू एका संघात खेळतात, ही खूप चांगली गोष्ट आहे. सहा आठवडय़ांच्या या लीगच्या कालखंडात त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होते. त्याचे धावांमध्येच रूपांतर होण्याची आवश्यकता नाही. परंतु यामुळे ते देशाचे सच्चे राजदूत होण्यास मदत होते. त्यामुळे आयपीएलने मौखिक परंपरा जपण्यात महत्त्वाची भूमिका जपली आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने सहाव्या दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानमालेत व्यक्त केले.
तो पुढे म्हणाला, ‘‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना अनेकदा केव्हिन पीटरसन माझ्याकडे डावखुरी फिरकी गोलंदाजी कशी खेळायची याचे मार्गदर्शन घ्यायचा. संजू सॅमसन ए बी डी व्हिलियर्सची मदत घ्यायचा, तर प्रवीण तांबे ब्रॅड हॉगच्या गोलंदाजीचे निरीक्षण करायचा. अशा प्रकारचे संवाद व्हायला हवेत.
मौखिक परंपरेचे महत्त्व विशद करताना द्रविडने महाभारतामधील द्रोणाचार्य-अर्जुन यांचेही दाखले दिल्यानंतर सांगितले की, ‘‘बालपणी माझ्या वडिलांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या. सुनील गावस्करने वेस्ट इंडिजविरुद्धच्या आपल्या पदार्पणीय कसोटी मालिकेत प्रतिकुल परिस्थितीत कशी फलंदाजी केली, हे मला वडिलांनी सांगितले. मला क्रिकेटवर प्रेम करायला शिकवले. त्यांच्या गोष्टी आजसुद्धा माझ्या मनावर बिंबल्या आहेत. मग प्रशिक्षक केकी तारापोर यांनी मला प्रशिक्षण देताना खेळातील मूल्यांची जाणीव करून दिली. ‘सभ्य गृहस्थांचा खेळ’ क्रिकेटला का म्हणतात, हे त्यांच्यामुळेच कळले.’’
‘‘रणजी सामन्यांसाठी रेल्वेच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यातून आम्ही प्रवास करायचो. तिथे खूप धडे मिळायचे. ईडन गार्डन्सला जर सामना असेल तर ४८ तास प्रवासातच जायचे. त्यावेळी अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंसोबत वेळ घालवायला मिळायचा, याबद्दल मी स्वत:ला नशीबवान मानतो. वेस्ट इंडिजच्या आग ओकणाऱ्या वेगवान गोलंदाजांचा कसा सामना केला, हे गुंडप्पा विश्वनाथ यांच्याकडून ऐकायला मिळाले. त्यामुळे अनुभवात अतिशय भर पडली,’’ असे द्रविडने यावेळी सांगितले.
भविष्यातील भारतीय प्रशिक्षक म्हणून तुझ्याकडे पाहिले जाते का, या ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना द्रविड म्हणाला, ‘‘प्रत्येक गोष्टीची वेळ आणि स्थळ ठरावे लागते. मी सध्या राजस्थान रॉयल्सला मार्गदर्शन करण्यात व्यग्र आहे. परंतु भविष्यात भारताचे किंवा कोणत्याही रणजी संघाचे प्रशिक्षक व्हायला मला आवडेल.’’
मुंबईचा क्रिकेट संघ ‘खडूस’!
‘‘एक प्रतिस्पर्धी संघ इतकेचे मला मुंबई क्रिकेटविषयी माहिती होते. परंतु विचारांचा वारसा पुढील पिढीनेही जोपासल्याची संस्कृती मुंबईमध्ये आहे. मुंबईचा क्रिकेट संघ ‘खडूस’ म्हणून ओळखला जातो. मी याचे अनेक अर्थ लावायचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या खेळाची झुंजार पद्धती यातच त्याचा भावार्थ दडला आहे. अनेक वर्षांपूर्वी सुनील गावस्करने फिरकी गोलंदाज रघुराम भटचा सामना करण्यासाठी डावखुरी फलंदाजी केली होती, तर अन्य गोलंदाजाचा सामना करताना तो नेहमीच्या पद्धतीने फलंदाजी करायचा. रणजीचा उपांत्य फेरीचा तो सामना चिवट झुंज देऊन गावस्करने अनिर्णीत राखला होता,’’ अशी आठवण द्रविडने यावेळी जागवली.
संशयास्पद शैली गुन्हा नाही!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संशयास्पद शैलीने गोलंदाजी करणे गुन्हा मानू नये. नो-बॉलप्रमाणेच तो असतो. परंतु तुम्ही शैलीत सुधारणा करा आणि पुनरागमन करा. यासंदर्भात आयसीसीचे नियम आहेत. त्यांनी जेव्हा आढावा घेतला तेव्हा अनेक माजी क्रिकेटपटूसुद्धा अशा प्रकारे गोलंदाजी करायचे. ग्लेन मॅकग्राचा कोपरसुद्धा गोलंदाजी करताना थोडा अधिक वाकायचा. त्याची गोलंदाजीची शैली वादग्रस्त होती असे मला अजिबात म्हणायचे नाही, असे द्रविडने स्पष्ट केले.
पत्नी-मैत्रिणींवर बंदी घातली तर गंभीर समस्या उद्भवेल!
पत्नी आणि मैत्रिणीच नव्हे तर कोणत्याही लिंगाच्या आवडीच्या व्यक्तीला खेळाडूसोबत दौऱ्यावर नेण्याची परवानगी द्यायला हवी. पत्नी किंवा मैत्रिणीमुळे खराब कामगिरी होते, असा आरोप करणे चुकीचे आहे. जर तुम्ही ही परवानगी दिली नाही, तर गंभीर समस्या उद्भवू शकेल, असा इशारा द्रविडने दिला.