राहुल त्रिपाठीचे शतक पाच धावांनी हुकले, मात्र त्याने विशांत मोरच्या (६२) साथीने केलेल्या दमदार भागीदारीमुळे महाराष्ट्राने पहिल्या डावात ४६१ धावांचा डोंगर रचला. रणजी क्रिकेट सामन्यात त्यांच्या या धावसंख्येस उत्तर देताना राजस्थानची पहिल्या डावात २ बाद ७६ अशी स्थिती झाली.

महाराष्ट्राने ३ बाद २८० धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. त्यांचा शतकवीर नौशाद शेखने स्वत:च्या धावसंख्येत आणखी २५ धावांची भर घातली. अशोक मनेरियाने त्याला बाद करीत महाराष्ट्राला धक्का दिला. शेख याने त्रिपाठीच्या साथीत १२२ धावांची भर घातली. त्याच्या पाठोपाठ चिराग खुराणा हा केवळ ९ धावा काढून तंबूत परतला. तथापि, त्रिपाठीने मोरेच्या साथीने सुरेख खेळ करीत डाव सावरला. त्यांनी ६७ धावांची भर घातली. त्रिपाठी हा शतकाच्या उंबरठय़ावर असताना अनिकेत चौधरीने त्याला बाद केले. त्रिपाठीने २६९ मिनिटांमध्ये १० चौकार व २ षटकारांसह ९५ धावा केल्या. मोरेने ११३ मिनिटांमध्ये आठ चौकारांसह ६२ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक  

  • महाराष्ट्र (पहिला डाव) : १४७.४ षटकांत सर्व बाद ४६१ (नौशाद शेख १४३, राहुल त्रिपाठी ९५, विशांत मोरे ६२; पंकजसिंग ४/६२, उल हक २/७७, महिपाल लोमरीर २/४७)
  • राजस्थान (पहिला डाव): ३० षटकांत २ बाद ७६ (मणिंदरसिंग खेळत आहे ३०; समाद फल्लाह १/३३, मोहसीन सय्यद १/१९)