घरचे मैदान असूनही विदर्भने राजस्थानच्या २१६ धावांना उत्तर देताना संथ आणि कूर्म गतीने खेळ करीत दिवसभरात जेमतेम २०२ धावांची मजल मारली. काही दिवसांपूर्वीच रणजी क्रिकेट स्पर्धेत १०,००० धावा करण्याचा विक्रम नावावर करणारा अनुभवी वसिम जाफर ८ धावा करून तंबूत परतला. भरवशाच्या फैझ फझलने ४० धावांची खेळी केली, मात्र त्यासाठी ८८ चेंडू खर्ची घातले. सुब्रमण्यम बद्रिनाथ याही लढतीत मोठी खेळी करू शकला नाही. त्याने २९ धावा केल्या. गणेश सतीशने १२ धावा केल्या. आदित्य शनवारे केवळ ९ धावा करून तंबूत परतला. जितेश शर्माही मोठी खेळी करू शकला नाही. त्याने १४ धावा केल्या. रवी जंगिड आणि आदित्य सरवटे यांनी सातव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करीत विदर्भला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जंगिड २७, तर सरवटे ४२ धावांवर खेळत आहेत. विदर्भचा संघ अजूनही १४ धावांनी पिछाडीवर आहे. राजस्थानतर्फे अनिकेत चौधरी, तन्वीर उल हक यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
राजस्थान : २१६ विरुद्ध विदर्भ ६ बाद २०२ (आदित्य सरवटे ४२, फैझ फझल ४०, अनिकेत चौधरी २/४०).