भारतीय महिला संघ क्रिकेटच्या मैदानात सुवर्ण अक्षरांनी इतिहास नोंदण्यासाठी सज्ज झालाय. ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन मितालीच्या नेतृत्त्वाखालील महिला संघाने यंदाच्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठली. गुरुवारी झालेल्या उंपात्य सामन्यात भारताने सहावेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी पराभूत केले. विजयानंतर या सामन्यात नाबाद शतकी खेळी करणाऱ्या हरमनप्रीत कौर आणि भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा देण्यासाठी आयपीएलचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार राजीव शुक्लांनी तत्परता दाखवली. मात्र, शुभेच्छा देताना त्यांनी दाखवलेली उत्सुकता त्यांचा क्रिकेटमधील अभ्यास कच्चा असल्याचे दाखविणारी ठरली. महिला विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर शुक्ला यांनी ट्विटवरुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. मात्र, या ट्विटमध्ये त्यांनी आयसीसी चॅम्पियन्स करंडकचा उल्लेख केला. त्यांच्या या ट्विटवर क्रिकेट चाहत्यांनी त्यांची शाळा घेतली. सध्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचल्या आहेत. त्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत खेळत नाहीत, अशा प्रतिक्रिया नेटिझन्समधून उमटताना दिसल्या. भारतीय पुरुष संघाच्या नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून ते बाहेर आल्याचे दिसत नाही, असाही सूर सोशल मीडियामध्ये पाहायला मिळाला.

चूक लक्षात येताच शुक्ला यांनी शुभेच्छाचे ट्विट काढून टाकले आहे. यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडूनही शुभेच्छा देताना चुकीचे ट्विट करण्यात आले होते. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजचे कौतुक करताना विराटने चुकीचे ट्विट केले होते. योगायोगाने विराटने देखील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावेळीच ही चूक केली होती. साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिताली सर्वात जास्त धावा करणारी महिला क्रिकेटपटू बनली. यावेळी विराटनं शुभेच्छा देताना मिताली ऐवजी पुनम राऊतचा फोटो अपलोड केला. विराटला ही चूक लक्षात आली नसली तरी त्याच्या सजग चाहत्यांना मात्र ही चूक लगेच लक्षात आली. ती मिताली नसून पूनम आहे हे चाहत्यांनी विराटला लक्षात आणून दिल्यावर विराटने लगेच पोस्ट डिलिट केली होती.