शेवटच्या मिनिटाला जस्टीन रीड रॉसने केलेल्या अचूक गोलामुळेच रांची ऱ्हिनोज संघाने ०-२ अशा पिछाडीवरून पंजाब वॉरियर्सला ३-२ असे पराभूत केले.  
चुरशीने झालेल्या या लढतीत पंजाबकडे ५१ व्या मिनिटांपर्यंत २-० अशी आघाडी होती. त्यांचे हे गोल किरॉन गोव्हर्स व सिरीएलो यांनी अनुक्रमे ३५ व्या व ५० व्या मिनिटाला केले. दोन गोलांच्या आघाडीमुळे पंजाब हा सामना सहज जिंकणार असे वाटले होते. मात्र ५२ व्या मिनिटाला रांची संघाच्या जस्टीन रीड रॉसने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत संघाचे खाते उघडले आणि तेथूनच रांचीने सामन्यावर नियंत्रण मिळविले. ६२ व्या मिनिटाला रांची संघाच्या मनदीपसिंग याने कोठाजितसिंगच्या पासवर सुरेख गोल करीत २-२ अशी बरोबरी साधली. हा सामना बरोबरीत राहणार असे वाटत असतानाच रांची संघास पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत जस्टीन याने अचूक फटका मारून गोल केला.