द्रुतगती गोलंदाज समाद फल्लाह याने ६७ धावांत पाच बळी घेतले, त्यामुळेच महाराष्ट्राने दिल्लीविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात तीन धावांची नाममात्र आघाडी मिळविली. रोशनारा क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या १९६ धावांना उत्तर देताना दिल्लीने ३ बाद ५९ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला.
 वैभव रावल याने झुंजार अर्धशतक करूनही त्यांचा डाव ७७ षटकांत १९३ धावांमध्ये गुंडाळला गेला. उर्वरित खेळात महाराष्ट्राने दुसऱ्या डावात बिनबाद तीन धावा केल्या. रावलने आत्मविश्वासाने खेळ केला. त्याने २८१ मिनिटांच्या खेळांत १५७ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या. महाराष्ट्राकडून फल्लाह याने ६७ धावांमध्ये पाच बळी घेतले. प्रथम दर्जाच्या सामन्यात एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी फल्लाह याने आतापर्यंत दहा वेळा केली आहे. निकित धुमाळ याने ३४ धावांमध्ये तीन बळी घेत त्याला चांगली साथ दिली. उर्वरित सहा षटकांमध्ये महाराष्ट्राच्या फलंदाजांनी सावध खेळ करीत बिनबाद तीन धावा जमविल्या.