फिरकीपटू कर्ण शर्माचे सहा बळी
रेल्वेच्या फिरकीपुढे एकामागून एक मुंबईचे फलंदाज धारातीर्थी पडत होते. उपहारापूर्वी फक्त २१ मिनिटांमध्ये मुंबईने चार महत्त्वाचे फलंदाज गमावले. २ बाद १३१वरून त्यांची ६ बाद १४७ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी मुंबईच्या संघाचे दोनशे धावांच्या आतमध्येच विसर्जन होणार की ते आघाडी मिळवणार, साराच संभ्रम होता. पण सलामीवीर अखिल हेरवाडकर मुंबईसाठी धावून आला. अखिलने मुंबईला फक्त स्थैर्यच मिळवून देत या परिस्थितीतून बाहेर काढले नाही, तर त्यांना आघाडी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. मोसमातील त्याचे हे पहिले शतक संघाला तारणारे तर होतेच, पण त्यामध्ये नजाकतभऱ्या फटक्यांची लज्जतही होती. अखिलने श्रेयस अय्यर आणि निखिल पाटील या दोन्ही अर्धशतकवीरांशी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दिवसअखेर मुंबईने ९ बाद ३३० अशी मजल मारली असून त्यांच्याकडे ११३ धावांची आघाडी झाली आहे. रेल्वेचा फिरकीपटू कर्ण शर्माने सहा बळी मिळवत मुंबईच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले.
अखिल आणि श्रेयस यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. श्रेयस बाद झाल्यावर मुंबईच्या बिनीच्या फलंदाजांनी तंबूत परतण्याची रांगच लावली. ५०व्या षटकात लाँग ऑनला एकेरी धेव घेत अखिलने मोसमातील पहिले शतक झळकावले. यामध्ये दहा चौकारांचा समावेश असला तरी एकही षटकार नव्हता. जमिनीलगतचे नजरेचे पारणे फेडणारे फटके हे अखिलच्या शतकी खेळीचे वैशिष्टय़ होते. मुंबई संघाचा डोलारा सांभाळणाऱ्या अखिलने तब्बल २७७ मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडली, २२० चेंडूंमध्ये १५ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने त्याने १४५ धावा केल्या. अघेत दिवस खेळून काढण्याचे काम चोख बजावले. निखिलने २ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ८२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली असून, त्याच्या शतकाची अपेक्षा मुंबईला असेल.
संक्षिप्त धावफक
रेल्वे (पहिला डाव) : २१७
मुंबई (पहिला डाव) ९४ षटकांत ९ बाद ३३० (अखिल हेरवाडकर १४५, निखिल पाटील खेळत आहे ८२; कर्ण शर्मा ६/९०).