क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणी कोणता फलंदाज मोठी खेळी खेळून जाईल याचा काही नेम नसतो. कधीकधी सलामी आणि मधल्या फळीतले फलंदाज झटपट माघारी परततात, पण तळातले फलंदाज गोलंदाजांच्या नाकीनऊ आणतात. तर कधी सलामीचे फलंदाज प्रतिस्पर्धी संघाने दिलेलं आव्हान लिलया पार करुन टाकतात. मग अशा प्रसंगांमध्ये गोलंदाज विकेट मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती आजमावत असतो. सध्या सुरु असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतही असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला.

बंगाल विरुद्ध छत्तीसगड सामन्यात दुसऱ्या डावात छत्तीसगडचा शेवटचा गडी बाद करण्यासाठी बंगालच्या मोहम्मद शमीने मोठी तटबंदीच उभी केली. दुसऱ्या फेरीत छत्तीसगडची अवस्था १०९/९ अशी झालेली असताना शमीच्या गोलंदाजीवर बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने चक्क ९ क्षेत्ररक्षकांना स्लिपच्या पोजीशनमध्ये उभं केलं. त्यामुळे यष्टीरक्षक आणि गोलंदाज सोडून संपूर्ण संघ एक विकेट घेण्यासाठी स्लिपमध्ये उभा असल्याचा हा अनोखा प्रकार रणजी सामन्यात पहायला मिळाला.

सामना संपल्यानंतर स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना मनोज तिवारीने या अनोख्या क्षेत्ररक्षणाविषयी आपली भूमिका मांडली. “मला कोणत्याही प्रकारे शेवटच्या फलंदाजाला जीवदान द्यायचं नव्हतं. अनेकवेळा बॅटची कडा लागून चेंडू सीमारेषेपार जातो, यामुळे अनावश्यक धावा प्रतिस्पर्धी संघाला मिळतात. त्यामुळे स्लिपमध्ये ९ क्षेत्ररक्षक उभे केल्याचा गोलंदाज म्हणून शमीलाही आधार वाटला.”

पहिल्या डावानंतर फॉलोऑनची नामुष्की ओढावलेल्या छत्तीसगडच्या संघाने, २२९/५ या धावसंख्येवरुन आपल्या डावाची सुरुवात केली. मात्र यानंतर अवघ्या ३० धावांमध्ये त्यांचे उर्वरित फलंदाज माघारी परतले आणि छत्तीसगडचा दुसरा डाव २५९ धावांमध्ये आटोपला. बंगालने हा सामना एक डाव आणि १६० धावांनी जिंकला. अशोक दिंडाने सामन्यात १० तर मोहम्मद शमीने सामन्यात ८ बळी मिळवले.