गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)रणजी क्रिकेट स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय बऱ्याच कर्णधार आणि प्रशिक्षकांना पटलेला नाही. त्यामुळेच त्यांनी मंगळवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणाऱ्या रणजी क्रिकेट सामन्यांना विरोध केला आहे. पूर्वीसारखे घरच्या आणि प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानांवर सामने खेळवण्यात यावेत, अशी मागणी कर्णधार आणि प्रशिक्षकांनी केली आहे. बीसीसीआयने कर्णधार आणि प्रशिक्षकांसाठी बैठकीचे मंगळवारी आयोजन केले होते.

‘यापुढे रणजी सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाऊ नयेत, अशी मागणी कर्णधार आणि प्रशिक्षकांनी बीसीसीआयच्या बैठकीमध्ये केली. या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलेला मुद्दा आम्ही तांत्रिक समितीपुढे मांडणार आहोत आणि वार्षिक सभेपूर्वी योग्य तो निर्णय आम्ही जाहीर करू. रणजी स्पर्धेबरोबत विजय हजारे आणि मुश्ताक अली स्पर्धेबाबतही चर्चा करण्यात आली,’ असे बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले.

सुरक्षेबाबत बीसीसीआयची आयसीसीला विचारणा

मंगळवारी मध्यरात्री मँचेस्टरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर  बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सुरक्षेबाबत विचारणा केली आहे.‘ मँचेस्टर येथे झालेल्या दशहतवादी हल्ल्याबद्दल मला माहिती मिळाली आणि त्यानंतर बीसीसीआयच्या कार्यालयात गेल्यावर मी आयसीसीला चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान भारतीय संघाला देण्यात येणाऱ्या सुरक्षेविषयी विचारणा केली आहे. खेळाडूंची राहण्याची आणि प्रवासाची कशी व्यवस्था करण्यात येणार आहे, याबाबतही आम्ही आयसीसीकडून आम्ही माहिती मागवून घेणार आहोत,’ असे बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले.

इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेला कडेकोट सुरक्षा व्यवस्था

मँचेस्टरमधील बॉम्बस्फोट घटनेनंतर इंग्लंडमधील सुरक्षा व्यवस्थेचे आम्ही अवलोकन केले असून चॅम्पियन्स करंडक व महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडतील, असे आयसीसीने एका पत्रकाद्वारे म्हटले आहे. चॅम्पियन्स स्पर्धा १ जूनपासून सुरू होत असून त्यामधील सामने लंडन, बर्मिगहॅम व कार्डिफ येथे आयोजित केले जाणार आहेत. २४ जून ते २३ जुलै या कालावधीत महिलांची विश्वचषक स्पर्धा होणार आहे. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाबरोबर सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. सामन्याच्या वेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असेल व खेळाडूंना कोणताही धोका होणार नाही, असे इंग्लंड क्रिकेट मंडळाने म्हटले आहे. या मंडळाने पुढे म्हटले आहे, चॅम्पियन्स चषक व त्यानंतर होणारी महिलांची विश्वचषक स्पर्धा कोणत्याही अडचणी न येता पार पडतील, अशी सुरक्षा व्यवस्था केली जात आहे.