साडेचारशे धावांचे आव्हान डोक्यावर असूनही शांत चित्ताने खेळ करीत मुंबईने कर्नाटकला चिवट लढत दिली.  त्यामुळे मुंबईने रणजी क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्य फेरीत दुसऱ्या डावात ६ बाद २७७ धावांची मजल मारली. कर्णधार आदित्य तरेचे शतक दोन धावांनी हुकले. मुंबईला विजयासाठी १६८ धावांची गरज असून  कर्नाटकला चार बळींची आवश्यकता आहे.
पहिल्या डावात  ४४ धावांमध्ये खुर्दा झालेला मुंबईचा संघ दुसऱ्या डावात फार वेळ झुंजणार नाही अशीच कर्नाटकची अपेक्षा होती, मात्र  मुंबईच्या तरे (९८), अखिल हेरवाडकर (३१), श्रेयस अय्यर (५०) सूर्यकुमार यादव (३६) व सिद्धेश लाड (नाबाद ४१) यांनी चिवट खेळ करीत सामन्यातील आव्हान कायम ठेवले.
तरे व हेरवाडकर यांनी बिनबाद ६१ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. मात्र हेरवाडकर लगेचच बाद झाला. श्रीनाथ अरविंदने त्याला ३१ धावांवर पायचीत केले. त्यानंतर तरे व अय्यर या जोडीने पहिल्या डावातील कर्दनकाळ आर. विनयकुमार याच्यासह कर्नाटकच्या सर्व गोलंदाजांना जिद्दीने तोंड दिले. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भर घातली. ही जोडी खेळत असताना मुंबईचे फलंदाज विजयाचा पाया रचत आहेत, असेच चित्र होते. मात्र ही जोडी फुटल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षेइतकी मोठी भागीदारी झाली नाही.  तरे शतक पूर्ण करणार असे वाटत असतानाच अरविंदने त्याला बाद केले. तरेने १५ चौकारांसह ९८ धावा केल्या. अय्यरने अर्धशतक पूर्ण केले मात्र लगेचच तो तंबूत परतला. त्याने सात चौकारांसह ५० धावा केल्या. सूर्यकुमार व लाड यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अभिमन्यू मिथुन याने सूर्यकुमारला ३६ धावांवर बाद करीत ही जोडी फोडली. सूर्यकुमारच्या पाठोपाठ मुंबईने निखिल पाटील (०), विल्कीन मोटा (९) यांच्याही विकेट्स गमावल्या. एका बाजूने झुंजार खेळ करीत लाड याने नाबाद ४१ धावा केल्या.  मुंबईच्या विजयाची मदार सर्वस्वी त्याच्यावर असेल.  
संक्षिप्त धावफलक
कर्नाटक : २०२ व २८६
मुंबई : ४४ व ६ बाद २७७ (आदित्य तरे ९८, श्रेयस अय्यर ५०,   सिद्धेश लाड नाबाद ४१, अभिमन्यू मिथुन ३/४९).