पहिल्या सामन्यात जम्मू-काश्मीरकडून लाजिरवाणा पराभव, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात रेल्वेकडून पिछाडीवर पडलेला मुंबईच्या संघाने तिसऱ्या सामन्यात मात्र उत्तर प्रदेशला त्यांच्याच मातीत धूळ चारत आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईने सहा गुणांची कमाई केली आहे. सामन्यात एकूण नऊ बळी आणि ८७ धावांची अमूल्य खेळी साकारणाऱ्या शार्दुल ठाकूरला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
मंगळवारच्या बिनबाद सात धावसंख्येवरून खेळताना उत्तर प्रदेशला बुधवार सकाळपासूनच धक्का बसायला सुरुवात झाली. सातव्या षटकामध्ये त्यांची २ बाद २० अशी अवस्था झाली. त्यानंतर एका बाजूने ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत त्यांनी ७ बाद ८४ अशी बिकट अवस्था झाली. पण या वेळी उमंग शर्मा आणि प्रवीण कुमार यांनी आठव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. प्रवीण कुमारने या वेळी ४२ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि तीन षटकार लगावत ४७ धावांची खेळी साकारली. उमंगने या वेळी ९ चौकारांच्या जोरावर ६० धावांची सर्वाधिक खेळी साकारल्यामुळे उत्तर प्रदेशला दुसऱ्या डावात १६१ धावा उभारता आल्या.
विजयासाठी ९८ धावांची गरज असताना मुंबईचा संघ एकही विकेट न गमावता हे आव्हान पूर्ण करेल असे वाटत होते. पण मुंबईने दोन्ही सलामीवीर ३५ धावांमध्ये गमावले. त्यानंतर मात्र सूर्यकुमार यादव (नाबाद ४७) आणि अभिषेक नायर (नाबाद २०) यांनी मुंबईच्या विजयावर शिगक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक
उत्तर प्रदेश : २०६ आणि ५०.४ षटकांत सर्व बाद १६१ (उमंग शर्मा ६०, प्रवीण कुमार ४७; विल्किन मोटा ४/३०) पराभूत वि. मुंबई : २७० आणि १५.४ षटकांत २ बाद ९८ (सूर्यकुमार यादव नाबाद ४७, अभिषेक नायर नाबाद २०; अंकित राजपूत २/३४) सामनावीर : शार्दुल ठाकूर.