आजपासून अंतिम सामन्याला सुरुवात; स्वप्नवत अजिंक्यपदासाठी सौराष्ट्र उत्सुक

सामन्यात कोणत्याही वेळी कलाटणी देत शिरजोर होण्याची क्षमता असलेला बलाढय़ मुंबईचा संघ रणजी क्रिकेट स्पर्धेतील ४१व्या विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. मात्र पहिल्यावहिल्या विजेतेपदाच्या ध्येयाने उतरलेले सौराष्ट्रचे खेळाडू त्यांना कसे सामोरे जातात, हीच क्रिकेट जगतात खरी उत्सुकता निर्माण झाली आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बुधवारपासून या लढतीला प्रारंभ होत आहे. रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे या वलयांकित खेळाडूंची अनुपस्थिती असूनही मुंबईचेच पारडे जड राहील अशी अपेक्षा आहे. स्थानिक क्रिकेटमधील सर्वोच्च प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत मुंबईने आतापर्यंत ४५ वेळा अंतिम फेरी गाठली असून त्यापैकी ४० वेळा त्यांनी रणजी करंडक जिंकला आहे.
सौराष्ट्रला मात्र अद्यापही या चषकावर आपले नाव कोरता आलेले नाही. मुंबई व सौराष्ट्र यांच्यात आतापर्यंत ५३ वेळा सामने झाले आहेत. त्यापैकी २७ सामने मुंबईने जिंकले आहेत तर २६ सामने अनिर्णीत राहिलेले आहेत. अनिर्णीत राहिलेल्या २६ सामन्यांपैकी २२ सामन्यांमध्ये मुंबईने पहिल्या डावात आघाडी मिळवली होती, तर चार सामन्यांमध्ये सौराष्ट्रला आघाडी मिळाली होती.
आदित्य तरेच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या मुंबईला फलंदाजीबाबत तरेसह सूर्यकुमार यादव, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, अभिषेक नायर यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. धवल कुलकर्णीच्या पुनरागमनामुळे त्यांच्या गोलंदाजीची धार वाढली आहे. त्याला शार्दूल ठाकूर, इक्बाल अब्दुल्ला यांची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे.
सौराष्ट्रच्या कर्णधारपदाची धुरा जयदेव शहा सांभाळत आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्या संघाने विदर्भ संघावर एक डावाने मात केली होती, तर उपांत्य फेरीत त्यांनी आसामविरुद्ध निर्णायक विजय मिळविला होता. या दोन्ही विजयांमुळे सौराष्ट्रचा आत्मविश्वास उंचावला आहे. फलंदाजीत त्यांना चेतेश्वर पुजारा, सागर जोगियानी, शेल्डॉन जॅक्सन व अवी बारोट यांच्याकडून मोठय़ा कामगिरीची अपेक्षा आहे.
या मोसमात सातत्याने प्रभावी कामगिरी करणारे जयदेव उनाडकट, हार्दिक राठोड व दीपक पुनिया यांच्यावर त्यांच्या गोलंदाजीची मदार आहे. भारतीय संघाकडून खेळणारा रवींद्र जडेजाची अनुपस्थिती त्यांना जाणवण्याची शक्यता आहे.
‘‘आम्ही २०१२-१३च्या मोसमात अंतिम फेरी गाठली होती. त्या वेळी मुंबईकडून सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, वासिम जाफर यांच्यासह अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू होते. त्यामुळे आमचा निभाव लागला नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. मुंबईकडे कसोटी दर्जाचे खेळाडू नाहीत त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी चिवट झुंज देण्याची संधी आहे. या संधीचा आम्ही पुरेपूर फायदा घेणार आहोत,’’ असे सौराष्ट्र संघाचे प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी सांगितले.

चेतेश्वर पुजारा हा आमच्या विजयाच्या मार्गातील मुख्य अडथळा आहे. चार-पाच दिवसांच्या सामन्यात खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. मात्र आमच्याकडेही संमिश्र मारा आहे. आमचे गोलंदाज त्याच्या खेळावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतील अशी मला आशा आहे. त्याला जीवदान द्यायचे नाही, ही आमच्या क्षेत्ररक्षकांवरील मोठी जबाबदारी राहील.
– आदित्य तरे, मुंबईचा कर्णधार

विजेतेपदासाठी मुंबई दावेदार असला तरी आम्ही अंतिम फेरीत स्थान मिळविताना सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. बाद फेरीतील निर्णायक विजयांमुळे आमच्या खेळाडूंचा उत्साह वाढला आहे. विजेतेपदाच्या उंबरठय़ावर आलो असताना आता मागे हटायचे नाही, हेच आमचे ध्येय आहे. संघातील प्रत्येक खेळाडू येथे सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.
– जयदेव शहा, सौराष्ट्रचा कर्णधार

संघ : मुंबई : आदित्य तरे (कर्णधार व यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, अभिषेक नायर, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, निखिल पाटील, शार्दूल ठाकूर, सिद्धेश लाड, धवल कुलकर्णी, विशाल दाभोळकर, इक्बाल अब्दुल्ला, आलम बद्री, भाविन ठक्कर, सुफियान शेख, बलविंदरसिंग संधू (कनिष्ठ).
सौराष्ट्र : जयदेव शहा (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, अवी बारोट, चेतेश्वर पुजारा, चिराग जानी, जयदेव उनाडकट, प्रेरक मंजाद, कमलेश मकवाना, धर्मेद्रसिंह जडेजा, वंदीत जिवराजानी, अर्पित वासवदा, दीपक पुनिया, हार्दिक राठोड, मोहसीन दोडिया, सागर जोगियानी (यष्टीरक्षक).