ईडन गार्डन्सवर मुंबईच्या २० वर्षीय श्रेयस अय्यरची बॅट तळपली आणि त्याने प्रथम श्रेणीतील पहिलेवहिले शतक साकारले. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या ‘अ’ गटातील बंगालविरुद्ध सामन्याच्या पहिल्या दिवशी मुंबईने ४ बाद ३०६ अशी दमदार मजल मारली आहे.
रणजीच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या तीन सामन्यांनंतर निवड समितीने सहा खेळाडूंना वगळले होते. त्यानंतर पहिल्याच सामन्यात मुंबईची कामगिरी दर्जाला साजेशी झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या अय्यरने बंगालच्या गोलंदाजांची जोरदार पिटाई केली. त्याने चार षटकार आणि १६ चौकारांच्या साहाय्याने १७५ चेंडूंत आपली शतकी खेळी साकारली. त्याने वीर प्रतापला दोन आणि अशोक दिंडाला एक षटकार ठोकला.
बंगालचे क्षेत्ररक्षण समाधानकारक झाले नाही. दिंडानेच अय्यरचा बळी मिळवला. अय्यरने अभिषेक नायरसोबत (१२७ चेंडूंत ८ चौकारांसह ६५ धावा) तिसऱ्या विकेटसाठी १७६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
अय्यरने उत्तर प्रदेशविरुद्धच्या आधीच्या सामन्यात ७५ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात मुंबईने आठ विकेट राखून विजय मिळवला होता.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : ८६.२ षटकांत ४ बाद ३०६ (श्रेयस अय्यर १५३, अभिषेक नायर ६५; वीर प्रताप सिंग २/७९)