तामिळनाडूकडून डावाच्या पराभवानंतर बडोद्याविरुद्धच्या रणजी सामन्याच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित कर्णधार आदित्य तरे आणि सलामीवीर श्रीदीप मंगेला यांच्या अर्धशतकाच्या जोरावर संयत सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसअखेर मुंबईने ६ बाद २१८ अशी मजल मारली आहे.
मुंबईने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आणि अर्धशतकी सलामीनंतर भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर ठरावीक फरकाने मुंबईने आपले फलंदाज गमावले. पदार्पण करणाऱ्या मंगेलाने ८ चौकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारत संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला, पण अर्धशतक झळकावल्यावर त्याला जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहून फटकेबाजी करता आली नाही. मंगेला बाद झाल्यावर सामन्याची सूत्रे तरेने हातामध्ये घेतली. पण त्याला दुसऱ्या टोकाकडून सूर्यकुमार यादव (१३), सिद्धेश लाड (१८) आणि निखिल पाटील (१२) यांच्याकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने मुंबईला जास्त धावा करता आल्या नाहीत. तरेने ८ चौकारांच्या जोरावर नाबाद ६७ धावांची खेळी साकारत एक बाजू लावून धरली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.