वर्षांअखेपर्यंत जागतिक दुहेरी बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल दहा जणांमध्ये स्थान मिळवू, असा विश्वास ज्वाला गट्टाने व्यक्त केला. पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेच्या दृष्टीने दुहेरी बॅडमिंटनमधील भारताचे आशास्थान ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना सहाय्य करण्याचा निर्णय ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’ने (ओजीक्यू) घेतला आहे.
‘‘आम्ही सध्या जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर आहोत. कॅनेडियन खुल्या स्पध्रेनंतर आम्ही अव्वल दहा क्रमांकांमध्ये मजल मारली होती; परंतु जपान आणि कोरियन खुल्या स्पध्रेदरम्यान मी आजारी पडले आणि क्रमवारीतील स्थान खालावले. परंतु वर्षांचा शेवट अव्वल दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळवून करायचा आहे. याशिवाय दुबईत होणाऱ्या सुपर सीरिज स्पध्रेसाठी पात्र व्हायचे आहे,’’ असे ज्वालाने मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सांगितले.
यावेळी अश्विनी म्हणाली की, ‘‘यापूर्वीपेक्षा दर्जेदार कामगिरी करण्याचे आमचे लक्ष्य आहे आणि त्यासाठी आम्ही अधिक मेहनत घेणार आहोत. ऑलिम्पिकपूर्वीच्या सर्व स्पर्धा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. यासाठी आम्ही शंभर टक्के तंदुरुस्त राहून झोकून देण्याचा प्रयत्न करू.’’
काही दिवसांमध्ये चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा १० नोव्हेंबरला सुरू होणार आहे. त्यानंतर १७ नोव्हेंबरला हाँगकाँग आणि २४ नोव्हेंबरला मकाऊ येथे स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील कामगिरी चांगली झाल्यास त्यांना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
‘‘ज्वाला आणि अश्विनी ही भारताची महिला दुहेरीतील सर्वोत्तम जोडी आहे, याबाबत प्रश्नच नाही. जगातील अव्वल २० जोडय़ांमध्येही या दोघींचा समावेश केला जातो. त्यामुळेच ‘ओजीक्यू’ने त्यांना साहाय्य करण्याचे निश्चित केले आहे,’’ असे पदुकोण यांनी सांगितले.
माजी क्रीडापटू गीत सेठी आणि प्रकाश पदुकोण यांनी खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट ही संस्था स्थापन केली आहे.