भारताचा आंतरराष्ट्रीय मास्टर के.रत्नाकरनने पहिल्या फेरीत ग्रॅण्डमास्टर झोंग झांगवर मात केली आणि आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदविला. पुण्याच्या अभिजीत कुंटे, ईशा करवडे व सौम्या स्वामिनाथन यांनी शानदार विजय मिळविला.
रत्नाकरनने सुरेख डावपेच करीत झांगला निष्प्रभ केले. या विजयामुळे त्याला ग्रॅण्डमास्टर किताबाचा अंतिम निकष पूर्ण करण्याची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताची ग्रॅण्डमास्टर कोनेरू हंपीला किर्गिझस्तानच्या अ‍ॅसिली अब्देजापारविरुद्ध धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात बरोबरी करण्याची संधी हंपीने वाया घालविली. निम्झो इंडियन डिफेन्सच्या या डावातील मध्याला तिला बरोबरी करणे शक्य होते. मात्र तिने चुकीची चाल केली व डाव गमावून बसली. हंपी व द्रोणावली हरिका या दोन्ही भारतीय खेळाडूंनी महिला विभागात भाग घेण्याऐवजी खुल्या गटात भाग घेतला आहे. हरिकाला सीरियाच्या बाशेर इयोतीविरुद्धचा डाव बरोबरीत सोडविला.
द्वितीय मानांकित पद्मिनी राऊतने व्हिएतनामच्या निग्वेन थेई तानही हिच्यावर सहज विजय मिळविला. ईशा करवडेने मिनू असगारीझादेहविरुद्ध एकतर्फी विजय नोंदविला. सौम्याला निबेल अल्गीदाहविरुद्ध विजय मिळविताना फारशी अडचण आली नाही. माजी राष्ट्रीय विजेती मेरी अ‍ॅन गोम्सने अलिमेबी किझी ऐहजानचा सहज पराभव केला. एस.विजयालक्ष्मी हिने अल्शेबेई बोशराला हरविले, मात्र तिची सहकारी तानिया सचदेवला राणा हकिमीफर्दाविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले. गोव्याची खेळाडू भक्ती कुलकर्णीने स्थानिक खेळाडू मोना अल हर्मोदीचा पराभव केला.
नाशिकच्या विदित गुजरातीने बांगलादेशच्या इनामुल हुसेनला हरविले, तर कृष्णन शशीकिरणने कझाकिस्तानच्या पेत्र कोस्तेन्कोचा पराभव केला. सूर्यशेखर गांगुलीने मंगोलियाच्या शारव्हादोर्ज दाशेझेगवेविरुद्ध सहज विजय मिळविला. ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटेने असाद मार्मेबेईवर एकतर्फी मात केली.