नागपूर कसोटीत आफ्रिकेचा ७९ धावांत डाव संपला. खेळपट्टीवर चेंडू वळत होता आणि खालीसुद्धा राहात होता. तरीसुद्धा ७९ धावांत डाव आटपणे याचे समर्थन होऊ शकत नाही. खेळपट्टीच्या भीतीने आफ्रिकेचे फलंदाज चेंडूऐवजी खेळपट्टीशी मुकाबला करण्यात बुडून गेले आणि आधी मनातून आणि नंतर खेळपट्टीवर बाद झाले. स्पिनकव्हर करून फुटवर्कवर फ्लाइटचा मुकाबला करणे हे तंत्र रातोरात येत नाही. दहा दहा चेंडूचं टार्गेट ठेऊन खेळावं लागतं. पूर्वी पाहुण्या संघांपैकी ऑस्ट्रेलियाचा हेडन आणि इंग्लंडचा ऍलिस्टर कुक यांनी सरावाच्या जोरावर भारतीय खेळपट्यांवर यशस्वी किल्ला लढवला होता. नागपूरला भारताने २१५ आणि १७३ धावा काढल्या त्यात अननुभवी आफ्रिकेच्या गोलंदाजांचा हातभार लागला. हामर आणि एल्गार यांनी मधून मधून आखूड टप्प्याच्या अनेक वाढदिवस भेटी भारतीय फलंदाजाना दिल्या. विजय आणि पूजाराने पुन्हा इच्छाशक्ती दाखवली. जडेजाची फलंदाजी बघता त्याला अशा खेळपट्यांवर गरजेप्रमाणे बढती द्यायला हरकत नाही.
दोन्ही संघानी त्यांच्या लेगस्पिनर्सचा खूप उशिरा केलेला उपयोग एक गोष्ट सांगून गेला की क्रिकेटमध्ये सध्या सर्व संघाना ऑफस्पिनरची दहशत वाटतीये, लेगस्पिनरची नाही. मिश्रा आणि ताहिर हे कर्णधारांचा गोलंदाज म्हणून तिसरा चॉइस आहेत. अश्विन, नेदन लायन, मोईन अली हे कर्णधारांचे इस्पिकचे एक्के आहेत. ताहिरचा लेगस्पिन फारसा वळत नाही. त्याचा फक्त गुगली वळतो. त्यामानाने मिश्राचा लेगस्पिन जास्त वळतो.
खेळपट्टीवर चर्चेचे गुऱ्हाळ कितीही रंगले असले, तरी या परिस्थितीत सुद्धा तग धरणारे खेळाडू कौतुकास पात्र आहेत.
– रवि पत्की