भारतीय क्रिकेट संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आता राष्ट्रीय निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील आणि शास्त्री यांच्यामध्ये चुरस रंगणार आहे.

‘ मंगळावारी सकाळी मी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा अर्ज सादर केला आहे. प्रशिक्षकपदाच्या जाहीरातीमध्ये असलेले सर्व कागदपत्रे मी क्रिकेट मंडळाला इ-मेल केली आहेत,’ असे शास्त्री यांनी सांगितले.

प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी काही तयारी केली आहे का, असे विचारल्यावर शास्त्री म्हणाले की, बीसीसीआयला जे काही या पदासाठी आवश्यक वाटते त्या सर्व गोष्टींची पूर्तता मी करणार आहे. या पदासाठी अर्ज करावासा वाटला म्हणून मी करत आहे. यापेक्षा अन्य कोणत्याही गोष्टींवर मला टिप्पणी करायची नाही.’

भारतीय संघाबरोबर १८ महिने माझ्यासाठी संस्मरणीय आहेत, असे शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत शास्त्री यांच्याकडे संघाचे संचालकपद होते. पण त्यानंतर करार संपुष्टात आल्यावर बीसीसीआयने संघासाठी पूर्णवेळ प्रशिक्षक हवा, अशी जाहीरात दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून शास्त्री हे संघाबरोबर आहेत, त्यामुळे त्यांना या पदासाठी अधिक पसंती देण्यात येऊ शकते. कारण पाटील यांनी १९९६ साली फक्त सहा महिन्यांसाठी भारताचे प्रशिक्षकपद भूषवले होते.