विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यावर भारतीय चाहत्यांनी धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांची समाजमाध्यमांवर खिल्ली उडवली होती. पण संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी विराटची पाठराखण केली आहे. कोहलीचे फलंदाजीचे तंत्र योग्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
‘‘जर कोहलीच्या फलंदाजीच्या तंत्रामध्ये कसूर असती, तर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चार शतकांसह ७०० धावा फटकावल्या नसत्या. त्याची कामाची तत्त्वे फारच उत्तम आहेत आणि याबाबतीत त्याच्या जवळ जाणारे फारसे फलंदाज नाहीत. त्याची कारकीर्द अजूनही संपलेली नाही. त्यामुळे त्याच्याबाबत उलटसुलट चर्चा करणे योग्य नाही,’’ असे शास्त्री म्हणाले.
धोनीच्या फलंदाजीविषयी विचारले असता शास्त्री म्हणाले की, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याला एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला नक्कीच वेळ मिळेल. तो पूर्णपणे तंदुरुस्त राहून आपल्या फलंदाजीवर चित्त एकाग्र ठेवू शकतो. त्याच्यामध्येही अजून बरेच क्रिकेट बाकी असून, त्याचा फायदा भारतीय युवा क्रिकेटपटूंना नक्की होईल.’’
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाबद्दल शास्त्री म्हणाले की, ‘‘उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाने सरस खेळ केला. आम्हीही चांगली कामगिरी केली, पण ऑस्ट्रेलियाने बाजी मारत अंतिम फेरी गाठली आणि त्यांनीच विश्वचषक पटकावला.’’