अनिल कुंबळे राजीनामा प्रकरणात विराट कोहलीच्या वागणुकीवर सध्या सर्व स्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी कुंबळेंची बाजू घेत कोहलीला या प्रकरणात दोषी धरलंय. मात्र गेले काही वर्ष भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहणाऱ्या आर.श्रीधर यांनी कुंबळें ऐवजी रवी शास्त्रींना आपला पाठींबा दर्शवला आहे.

हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्राशी बोलताना श्रीधर यांनी कुंबळेंऐवजी रवी शास्त्री संघासाठी गरजेचे असल्याचं म्हणलंय. दोघांच्याही कार्यशैलीतला फरक स्पष्ट करताना श्रीधर म्हणाले, ”रवी शास्त्री सरावादरम्यान खेळाडूंचा स्वभाव, त्यांचा खेळाप्रती असलेला दृष्टीकोन या गोष्टी विचारात घेतात. तोच दृष्टीकोन मैदानात घेऊन खेळाडू सामना कसे जिंकवून देऊ शकता यावर शास्त्री यांचा नेहमी भर असतो.” मात्र कुंबळे यांचा स्वभाव हा शास्त्रींच्या नेमका विरुद्ध आहे. मैदानात यश मिळवण्यासाठी केवळ आपण सांगतोय त्याच पद्धतीचा वापर व्हावा, असा कुंबळेंचा कल होता, असंही श्रीधर म्हणाले.

रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत, त्यांनी एकसारखचं वागाव अशी अपेक्षा करणं चुकीचं असल्याचंही श्रीधर यांनी म्हणलंय. सध्या क्रिकेटमध्ये संघातील खेळाडूंमधल्या उर्जेचा वापर करुन घेणं गरजेचं आहे. त्यांची ग्रहणशक्ती कशी आहे याचाही विचार होणं गरजेचं आहे. जरी आपले विचार समोरच्याशी पटत नसतील, तरीही संघातल्या प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी करण्यासाठी आपल्या विचारांना मुरड घालावी लागते, असं म्हणत श्रीधर यांनी नकळत कुंबळेंच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

रवी शास्त्रींचा खेळाडूंशी सामन्याआधी होणारा एक संवाद संघाला एक उर्जा द्यायचा. कोहली आणि त्याचा संघ हा अनुभवी खेळाडूंचा संघ आहे, मैदानात आलेल्या प्रत्येक अडचणींचा ते सामना करु शकतात. फक्त त्यासाठी प्रशिक्षकाने त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं, जे करण्यात अनिल कुंबळे नेहमी अयशस्वी ठरले, असं श्रीधर यांनी म्हणलंय. जर एखाद्या संघाचं नेतृत्व तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सर्वांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल असं सांगत श्रीधर यांनी अप्रत्यक्षरित्या कुंबळेंपेक्षा शास्त्रीच प्रशिक्षकपदासाठी योग्य असल्याचं सुचवलंय.