वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघाने २-० अशी जिंकली. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन सामने अनिर्णीत राहिले, तर दोन सामने भारताने जिंकले. चौथी कसोटीत पूर्णपणे पावसाचा खेळ पाहायला मिळाला. या कसोटी मालिकेत भारताचा फिरकीपटू आर.अश्विन याने अष्टपैलू कामगिरी केली आणि एक नवा विक्रम देखील प्रस्थापित केला. चौथी कसोटी अनिर्णीत घोषित करण्यात आल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात फिरकीपटू अश्विन याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत अश्विनचा हा सहावा मालिकावीराचा किताब ठरला. सहाव्यांदा मालिकावीराचा पुरस्कार जिंकून अश्विनने माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडीत काढला आहे. याआधी सचिन आणि सेहवाग यांना पाच वेळा मालिकावीरचा बहुमान मिळाला होता.
अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या या कसोटी मालिकेत केवळ गोलंदाज म्हणून नाही, तर फलंदाज म्हणूनही दमदार कामगिरी केली. कसोटीत अश्विनच्या खात्यात चार शतके जमा झाली आहेत, यातील दोन शतके अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकली आहेत. कसोटी गोलंदाजी क्रमवारीत देखील अश्विन अव्वल स्थानावर आहे. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी एक डाव आणि ९२ धावांनी जिंकली होती. अश्विनने पहिल्या कसोटीत विंडीजविरुद्ध ८३ धावांत सात गडी बाद केले होते.