ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि गुजरात लायन्स संघाचा सध्याचा प्रशिक्षक ब्रॅड हॉजने विराट कोहलीबद्दल केलेल्या विधानावर माफी मागितली खरी पण हॉजच्या माफीनाम्यावरून फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने त्याची चांगलीच ‘फिरकी’ घेतली. यापुढे ३० मार्च हा दिवस ‘जागतिक माफीनामा दिन’ म्हणून ओळखला जाईल, असे खोचक ट्विट अश्विनने केले आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये रंगलेल्या वाकयुद्धामुळे चांगलीच गाजली. खेळाडूंमध्ये उडालेले खटके आणि ऑस्ट्रेलियन माध्यमांनी कोहलीवर केलेली टीका यामुळे ढवळून निघालेले वातावरण कमी की काय त्यात ब्रॅड हॉजने कोहलीवर आरोप करून आगीत तेल ओतण्याचे काम केले होते. आयपीएल खेळण्यासाठीच विराट कोहली धरमशाला कसोटीत विश्रांती घेतली, असे अजब तर्कट हॉजने मांडले होते. त्यावर नेटिझन्स आणि क्रीडा क्षेत्रारह विविध मंडळींनी हॉजवर टीकास्त्र सोडले.

रांची कसोटीत कोहलीला क्षेत्ररक्षण करताना उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. पूर्णपणे फिट नसल्याने कोहली अखेरची कसोटी खेळी शकला नव्हता. पण हॉज यांनी आपल्या अकलेचे तारे तोडून कोहलीने मुद्दाम विश्रांती घेतल्याचे म्हटले. त्यावर टीका सुरू झाल्यानंतर हॉजला उपरती आली. आपल्या ट्विटर अकाऊंटवर हॉजने कोहलीबद्दल केलेल्या वक्तव्यावर जाहीर माफीनामा सादर केला.

वाचा: ‘होय, मी चुकलो मला माफ करा’; कोहलीबद्दलच्या विधानावर ब्रॅड हॉजचा माफीनामा

मी स्वत: एक क्रिकेटपटू असल्याने एका महत्त्वाच्या सामन्यावेळी मैदानाबाहेर बसावं लागण्याचं दु:ख मी समजू शकतो. त्यामुळे कोहलीबद्दल केलेल्या विधानाबद्दल मी संपूर्ण देशाची आणि मुख्यत्वे कोहलीची वैयक्तिकरित्या माफी मागतो. एखाद्या व्यक्तिच्या भावना किंवा राष्ट्रप्रेम दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही, असे हॉजने आपल्या माफीनाम्यात म्हटले.